पूरग्रस्तांच्या मदतीसाठी साईबाबा धावले, शिर्डी संस्थान देणार 10 कोटींची मदत

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चोहोबाजूंनी ओघ सुरू झाला असून शिर्डी येथील साईबाबा संस्‍थानाने राज्‍यातील पुरग्रस्‍तांच्‍या मदतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

निधी देण्याची ही प्रक्रिया न्‍यायालयीन प्रक्रीयेस अधीन राहून करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. ही रक्कम मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्यात येणार आहे. संस्‍थानचे अध्‍यक्ष सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली आहे. पावसामुळे सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील काही भागांमध्ये हाहा:कार उडाला आहे. पुरामध्ये अनेकांचे संसार उध्वस्त झाले असून जवळपास 24 ते 28 जणांचे बळी गेले आहेत.

सांगली आणि कोल्हापुरातील पूर अत्यंत संथगतीने ओसरतोय. पाणी वेगाने कमी होत नसल्याने या भागामध्ये अजूनही चिंताजनक स्थिती आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्याचे आणि त्यांच्या स्थलांतराचे काम सुरू असून पूर ओसरल्यानंतर त्यांना आधार देणं गरजेचं ठरणार आहे. घरदार सगळंच वाहून गेल्यानं पुढे करायचं काय हा प्रश्न इथल्या पूरग्रस्तांना सतावतो आहे. त्यांची ही अडचण दूर करण्यासाठी राज्यभरातून मदतीसाठी अनेक हात पुढे येत आहेत. राज्यातील प्रत्येक नागरीक आपल्याला जी शक्य होईल ती करूया या विचाराने मदत करायला लागला आहे. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानही त्यात सहभागी झाले आहेत. संस्‍थानच्‍या वतीने निधीव्यतिरिक्त वैद्यकीय पथके व औषधे पाठवण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: