पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, सोनिया गांधी, राजनाथसिंह यांच्यासह दिगग्ज आहेत मैदानात

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज सात राज्यात पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण या टप्प्यात अनेक दिग्गजांचे भवितव्य यंत्रबंद होणार आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मतदारसंघात आज मतदान होत आहे.
या पाचव्या टप्प्यात एकूण 674 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 8 कोटी 75 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पाचव्या फेरीत सर्वात जास्त संख्येत महिला उमेवादर आहेत. बिहारमध्ये पाच मतदारसंघात, जम्मू-काश्मीरात दोन मतदारसंघात, झारखंड येथे चार मतदारसंघात, मध्य प्रदेशातील सात मतदारसंघ, राजस्थानातील बारा मतदारसंघ, उत्तर प्रदेशातील चौदा मतदारसंघ आणि पश्चिम बंगालमधील सात मतदारसंघात आज मतदान होतेय.

या दिग्गजांचे भवितव्य होणार यंत्रबंद

या टप्प्यामध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, राज्यवर्धन राठोड, जयंत सिन्हा, स्मृती इराणी, अर्जुन मेघवाल, राजीव प्रताप रुडी हे प्रमुख नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यासोबतच कृष्णा पुनिया, पूनम सिन्हा, सुबोधकांत सहाय आदी नेतेही मैदानात आहेत.

admin: