पश्चिम महाराष्ट्रात महापुराचे थैमान, शिवसेना पक्ष प्रवेशात तर मंत्री सुभाष देशमुख पक्ष कार्यात व्यस्त

कोल्हापूर, सांगली आणि सातारा परिसरात कृष्णा, पंचगंगा आणि कोयना नद्यांच्या महापुराने थैमान घातल्याने  विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. याचं भान मात्र राज्यकर्त्यांना आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोक मदतीसाठी याचना करत आहेत आणि अशा वेळी सत्ताधारी असलेली शिवसेना मात्र पक्षप्रवेशात तर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख हे भाजपच्या बैठकीत दंग असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.

शिवसेनेने आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेशासाठीच त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली होती. अन् त्यातच त्यांनी महापूरावर आपलं मतं व्यक्त करत नावापुरती औपचारिकता पूर्ण केली.

शिवसेना पक्ष सत्तेत आहे. सत्तेत असलेल्या पक्षाने अशा परिस्थितीत संवेदनशीलता बाळगायला हवी मात्र शिवसेना ती संवेदनशीलता पाळताना दिसत नाहीये, अशी चर्चा आता समाजमाध्यमांवर चालू झाली आहे. तर दुसरीकडे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री हे देखील पूरग्रस्त भागात मदतीसाठी न जाता पुण्यात भाजपच्या शक्ती प्रमुखांच्या बैठकीला हजर राहिले यावरून शिवसेना पक्षाला भाजपच्या मंत्र्यांना जनतेची किती काळजी आहे हे दिसून येते.

दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षाने या परिस्थितीत राजकारण करू नये आणि लोकांच्या मदतीला धावून जावं, असं आवाहन करायला उद्धव ठाकरे यावेळी विसरले नाहीत हे विशेष.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा


ग्लोबल न्युज नेटवर्क: