पण काँग्रेस – राष्ट्रवादीशीच चर्चा करायची हे त्यांचे धोरण होते-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दोन्ही ठिकाणी सत्तेत राहून टीका करायची हे आम्हाला मान्य नाही -मुख्यमंत्री

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी आज अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. विद्यमान सरकारचा कार्यकाळ आज संपत आहे, आणि नवीन सरकार सत्तेवर आलेले नाही. त्यामुळे फडणवीस यांनी राजीनामा दिला. परंतु काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्यपालांनी माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. त्यामुळे पुढील व्यवस्था म्हणून मी काम पाहणार असल्याचे फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

उद्धव ठाकरे व आमच्यामध्ये अडिच वर्षे मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली नव्हती. अमित शाह यांच्यासोबतही अशी चर्चा झालेली नव्हती. शिवसेनेने आमच्यासोबत चर्चेची सगळी दारे बंद केली आहेत. पण काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत मात्र चर्चा केली जात आहे. शिवसेनेचे नेते भाजपवर व नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका करीत आहेत. सत्तेत राहूनही आमच्यावर टीका केली जात असल्याचीही नाराजी फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता केली. येत्या काळात भाजपच्या नेतृत्वाखालीलच सरकार स्थापन होईल, असा दावाही फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत काय म्हणाले ?

गेल्या पाच वर्षांत आमच्या सरकारने भरपूर कामे केली. मोठ मोठे प्रकल्प मार्गी लावले. शहर, गाव, प्रत्येक ठिकाणी विकास झाला. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात प्रचंड काम झाले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेने लोकसभेत आम्हाला प्रचंड बहुमत दिले. विधानसभेत देखील महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो. आम्हाला (महायुती) बहुमत मिळालं. आम्हाला 160 जागा मिळाल्या. 105 जागा घेऊन भाजप निवडून आला. हा विजय या करिता मोठा आहे, कारण 70 टक्के जागा लढलेल्यांपैकी आम्हाला मिळाल्या. कामाची पावती जनतेने आम्हाला दिले.

दुर्दैवाने, अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. पण शिवसेना पक्षप्रमुख यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. सरकार बनविण्याचे आमचे मार्ग खुले आहेत, असे त्यांनी विधान केले. आमच्यासाठी तो धक्का होता. कारण लोकांनी महायुतीला मतदान केले होते. असे असताना आमचे सर्व पर्याय खुले आहेत असे ते का म्हणाले.

आम्ही पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणालो होतो, हा महायुतीचा कौल आहे. उद्धवजींचे आभार मानले होते. पण दुर्दैवाने 15 दिवस झाले, माध्यमांतून वक्तव्य चालू आहेत. माझ्यासमोर एकदाही अडिच वर्षांचा विषय झालेला नाही. किंबहूना एकदा आमची बोलणी अडिच वर्षांच्या मुद्द्यांवर फिस्कटली होती. एकदा अनौपचारिक चर्चेतही मी त्यांना बोललो होतो. मी अमित शाह आणि नितीन गडकरी यांनाही विचारलं. त्यांनी सांगितले की, आम्ही असा शब्द दिलेला नाही. आम्हाला कोणालाही खोटे ठरवायचे नाही.

परंतु चर्चाच करायची नाही त्यांनी (शिवसेनेने) ठरवले आहे. गेल्या पाच वर्षांत माझे व उद्धव ठाकरे यांचे  संबंध चांगले राहिले आहेत. वादाच्या परिस्थितीतही आम्ही चर्चा केली आहे. आताही मी अनेकदा फोन केले. पण उद्धवजींनी फोन घेतले नाहीत. आमची दारे खुली होती. मात्र, आमच्याशी चर्चा न करता शिवसेनेला काँग्रेस – राष्ट्रवादीशी चर्चा करायला वेळ होता. ज्यांच्या विरोधात मते मागितली त्यांच्याशी चर्चा करायला वेळ होता. पहिल्याच दिवसापासून त्यांची मानसिकता आहे की, काँग्रेस – राष्ट्रवादीशी सत्ता स्थापन करायची आहे.

पहिल्या दिवसापासून आम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या सोबत चर्चा करायचीच नाही. पण काँग्रेस – राष्ट्रवादीशीच चर्चा करायची हे त्यांचे धोरण आहे.

मी त्यांच्याशी टीका करणार नाही. पण आजुबाजूची मंडळी जी वक्तव्ये करीत आहेत, त्यातून मीडियात प्रसिद्धी मिळेल. आम्हालाही बोलता येते. यापेक्षा जास्त बोलू शकतो. पण आम्ही जोडणारी माणसे आहोत. तोडणारी नाहीत.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने बाळासाहेब ठाकरे आमच्याकरीता पुजनीय आहेत. आमच्याकडून त्यांचा अनादर होणार नाही. विधानसभा निवडणुका विरोधात लढलो तेव्हा आम्ही शिवसेना व उद्धवजींवर टीका केली नाही. पण गेल्या दहा दिवसांत शिवसेनेच्या नेत्यांनी आमच्या नेत्यांवर टीका केल्या. सामनातूनही टीका करीत होते. वृत्तपत्र असल्यामुळे ती टीका समजू शकतो. पण वृत्तपत्राच्या बाहेर जाऊनही टीका केली जात आहे. विरोधकांनी टीका केली असती तर समजू शकतो. पण सत्तेत राहूनही शिवसेना टीका करीत आहे. जगाने मोदीजींचे नेतृत्व मान्य केले. मोदीजींवर काँग्रेस व राष्ट्रवादीही टीका करीत नाही, इतकी खालची टीका शिवसेनेचे नेते (संजय राऊत) करीत आहेत. सोबत राहूनही अशी टीका, असे शब्द सुरूच राहणार असतील तर अशा प्रकारचे सरकार कशाला चालवायचे असा प्रश्न आमच्यासमोर आहे.

राज्यात 90 ते 100 टक्के शेतकऱ्यांचे पीक खराब झाले आहे. अशा परिस्थितीत तातडीने सरकार तयार होणे गरजेचे होते. तरीही आम्ही काळजीवाहू सरकार असतानाही काही निर्णय घेतले. पण पूर्णवेळ सरकार असते तर आणखी चांगले निर्णय घेता आले असते.

आज मी राज्यपालांकडे राजीनामा सादर केला. पण वैकल्पिक व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे. दैनंदिन कामाकरीता मी मुख्यमंत्रीपदी राहणार आहे. कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय आम्हाला घेता येणार नाहीत.

मला असे वाटते की, आम्हाला मोठा जनादेश मिळालेला आहे. त्याचा अनादर करणे योग्य नाही. जनतेवर पुन्हा निवडणुका लादणं योग्य नाही. राष्ट्रपती राजवट किंवा नवीन व्यवस्था होईपर्यंत मला काम करावे लागेल.

काही लोकं वक्तव्य करीत आहेत. भाजप आमदार फोडतेय असा प्रचार केला जात आहे. आमचे खुले आव्हान आहे की, पुरावा द्यावा. अन्यथा माफी मागावी. भाजप सरकार तयार करताना फोडाफोडीचे राजकारण करणार नाही. येत्या काळात जे सरकार बनेल ते भाजपच्या नेतृत्वाखालीलच बनेल हा विश्वास व्यक्त करतो. विलंब झाला त्याची खंत आहे.

गेल्या पाच वर्षांत मीडियातील सर्व पत्रकारांनी प्रचंड साथ दिली. टीकाही केली. टीका करणे त्यांचे काम आहे. चांगल्या कामाला त्यांनी प्रसिद्धी दिली. विरोधी पक्षाचेही आभार. विरोधी पक्ष त्यांचे काम करीत होता. विरोधी पक्ष आमचा शत्रू नाही. त्यांच्याशी वैचारिक विरोध आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: