शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत’
जळगाव । विधानसभा निवडणूक 2019 साठी मुक्ताईनगरमधून पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याऐवजी भाजपाकडून त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली.
शेवटपर्यंत उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नात असलेल्या खडसेंनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मात्र पक्षाचा निर्णय कटू असला तरी स्वीकारल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची मुलगी रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यादेखील उपस्थित होत्या. रोहिणी खडसे यांच्या डोळ्यांत मात्र यावेळी पाणी पाहायला मिळालं. अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे बंडखोरी करणार का? या चर्चांणा मात्र या निमित्तानं पूर्णविराम मिळाला आहे.
‘शरद पवार माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवताहेत’
‘शरद पवार माझ्याविषयी खोटी वक्तव्य का करत आहेत हेच मला ठावूक नाही. मी वर्षभरात शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही नेत्याची भेट घेतली नाही. मी कोणाच्याही संपर्कात नाही. पवारांचा दावा खोटा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावरून निवडणूक लढवण्याचा माझा विचार नाही’, असं खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर झाली. त्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळाली नाही. मात्र, त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांची नाराजी काही प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच घरात अडचण येते, पक्षाचा विषय तर फार मोठा आहे. उशिरा का होईना पक्षाने चांगला निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
रोहिणी खडसेंना निवडून द्या
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघासाठी रोहिणी खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. रोहिणी खडसे या युवा आहेत. काम करण्याचा अनुभव आहे. मतदार संघात परिचित आहे. त्यामुळे आता त्यांना सहकार्य करा, त्यांना निवडून द्या, असे आवाहनही एकनाथ खडसे यांनी केले. भाजपच्या माध्यमातून केलेले काम लक्षात घेत, भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी एकदिलाने काम करायचं आहे.