पुणे । कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ॲड. किशोर शिंदे यांना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने अखेर आपला पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस आघाडीने शिंदे यांना पाठिंबा दिल्याने या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा कोथरूडमध्ये रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोथरूड भागांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात विरोधकांचा सर्वमान्य उमेदवार कोण अशी चर्चा रंगली होती यावर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा देत किशोर शिंदे युतीचे सर्वमान्य उमेदवार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे आणि कॉग्रेसचे नेते अभय छाजेड यांनी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कोथरूड मधील निवडणुकीच्या लढतीत चंद्रकांत पाटील विरुद्ध किशोर शिंदे अशी थेट लढत होणार आहे.
चंद्रकांत पाटील त्यांच्याविरोधात विरोधकांचा सर्वमान्य एक उमेदवार असावा यासाठी मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. अद्यापपर्यंत राष्ट्रवादीने कोथरूड मतदारसंघात उमेदवार दिला नाही. त्यामुळे किशोर शिंदे हेच विरोधकांचे सर्वमान्य उमेदवार ठरणार आहेत.