नीरा डावा कालवा पाणी वाद, अजित पवारांची उडी वाचा काय म्हणाले अजितदादा

पुणे: पश्चिम महाराष्ट्रात पाण्यावरून राजकारण सुरु झालं आहे. नीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे नियमबाह्य पाणी बंद करण्याचा आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. याबाबतचा अध्यादेश येत्या दोन दिवसात काढला जाईल, असे महाजन म्हणाले होते.याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उडी घेत  ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी ठरवावं कुणाला आणि कसं पाणी द्यायचं, अस म्हटलं आहे.

याबाबत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.’इथेही लोकच राहतात आणि तिकडेही लोकच राहतात. आता ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी ठरवावं कुणाला आणि कसं पाणी द्यायचं, आम्हाला आता दुष्काळात राजकारण करायचं नाही. दुष्काळात प्राथमिकता लोकांना पाणी देण्याची आणि जनावर जगवण्याची आहे. आता बाकीचे प्रश्न आणि नंतर राजकारण नंतर,’

शरद पवार आणि अजित पवार यांनी आज एकत्रितपणे बारामती आणि दौंड तालुक्याचा दुष्काळी दौरा सुरु केला आहे. यावेळी ते या तालुक्यांमधील दुष्काळी गावांना भेटी देतील. बारामती तालुका पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी खैरेपडळ गावापासून आपल्या या दुष्काळ पाहणी दौऱ्याची सुरूवात केली. दोघांनीही बारामतीतील वढणे गावच्या चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला.

admin: