निकालाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या हालचालीत वाढ, शरद पवार व चंद्राबाबू नायडू केंद्रस्थानी

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील अंतिम टप्पा संपल्यानंतर विरोधकांच्या दिल्लीतील हालचालींना वेग आलेला आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देशम पार्टीचे नेते चंद्राबाबू नायडू यांनी विरोधी पक्षांमध्ये मध्यस्थी घेण्याची भूमिका घेतलेली आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीत पुन्हा चंद्राबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. गेल्या 24 तासांत नायडू यांनी शरद पवारांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. तसेच संध्याकाळी चंद्राबाबू नायडू युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत. त्यामुळे निकालनंतरची विरोधकांची रणनीती ठरविण्याला नायडू बळ देताना पाहायला मिळत आहेत. 

चंद्राबाबू नायडू यांच्या भेटीनंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, अजूनपर्यंत विरोधकांची रणनीती ठरली नाही. निकालांअगोदर विरोधकांची कोणती बैठक होणार नाही. विरोधी पक्षातील सर्व नेते सध्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष ठेवून आहेत. मात्र शरद पवार यांच्या भेटीनंतर चंद्राबाबू नायडू सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात पुन्हा एकदा पवार केंद्रस्थानी आल्याची चर्चा दिल्लीत सुरु आहे. चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेत सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे प्रयत्न सुरु केलेत.
23 मे रोजी निकाल लागण्याआधी विरोधकांनी एकत्र येत निकालानंतरची रणनीती ठरवावी यासाठी चंद्राबाबू नायडू प्रयत्नशील आहेत. विरोधकांची रणनीती ठरविण्यासाठी 21 मे रोजी दिल्लीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र काही कारणास्तव ती बैठक होणार नाही अशी माहिती आहे. 
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपण्याअगोदरच चंद्राबाबू नायडू यांच्याकडून विरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शुक्रवारी नायडू यांनी काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी, माकपा नेते सीताराम येचुरी आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्यानंतर शनिवारी चंद्राबाबू नायडू यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीनंतर नायडू यांनी लखनऊला जात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली. तसेच बसपा प्रमुख मायावती यांची भेट चंद्राबाबू नायडू यांनी घेतली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपाला कमी जागा मिळाल्या तर विरोधकांनी सत्ता स्थापनेसाठी दावा करावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

admin: