विखेंच्या नंतर कोण ? चव्हाण, थोरात की वडेट्टीवार, आजच्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीकडे लक्ष

मुंबई । राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभेतील रिक्तजागेवर आता कोणाची वर्णी लागणार, याचे उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. विखेंच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंजूर केला होता. काँग्रेसच्या विधानसभा पक्षनेत्याच्या निवडी साठी आज पक्षाच्या आमदारांची बैठक होणार आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विरोधी पक्षनेतेपदासाठी आता विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची नावे चर्चेत आहेत.

विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर विखे पाटील यांनी काँग्रेसच्या प्रचारातातून अंग काढून घेत भाजपतर्फे उमेदवारी मिळालेल्या सुजय विखेंचा प्रचार केला होता. तसेच विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा राहुल यांच्याकडे दिला होता. तो मंजूर करण्यात आल्यामुळे काँग्रेसच्या विधानसभेतील नेत्याच्या निवडीसाठी काँग्रेस आमदारांची बैठक होत आहे.

admin: