दौंडची आवक लाखाच्या आत, उजनी टक्केवारी शंभरी पार , भीमाकाठ जलमय

पंढरपूर, – भीमा खोर्‍यातील धरणांवरील पावसाचा जोर कमी झाला असल्याने पाणी सोडणे मंदावले आहे. याचा परिणाम दौंडची आवक ही 99 हजार क्युसेकची झाल्याने उजनीतून ही भीमेत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग 1 लाख 20 हजार क्युसेक करण्यात आला आहे.तर नीरा देवघर धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे तेथून पाणी सोडले जात असल्याने वीर धरणातून 90 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. दरम्यान आज दुपारी उजनी धरणाने टक्केवारीची शंभरी पार केली आहे.

दौंडची आवक होत असल्याने उजनीतून होणारा विसर्ग ही कमी झाला आहे. यामुळे पूरनियंत्रण करता येणे आता शक्य आहे. नीरा देवघर परिसरात मागील चोवीस तासात जवळपास 193 मिलीमीटर पाऊस झाल्याने येथून पाणी सोडले जात आहे. यामुळे वीर धरणातून जो 78 हजार क्युसेकचा विसर्ग होता तो 90 हजार करण्यात आला आहे. दरम्यान दुपारी एक वाजता नीरा नृसिंहपूर संगम येथे नदीचा विसर्ग हा 2 लाख 55 हजार क्युसेकचा होता तर पंढरपूरला भीमा नदी 2 लाख 35 हजार क्युसेकने वाहत होती.

पंढरीतील गोपाळपूर (मंगळवेढा रस्ता), अंबाबाई पटांगण (सोलापूर रस्ता) व टेंभुर्णीकडे जाणार्‍या पुलांवर पाणी आल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. याच बरोबर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी ओढ्यात पाणी भरल्याने रस्ते वाहतूक बंद ठप्प होती. अजनसोंड- देगाव दरम्यान ही रस्त्यावर पाणी आले होते. पंढरीत आज गोपाळपूर, डॉ. आंबेडकर नगर, नदीकाठ, कुष्ठरोग वसाहत, स्मशानभूमी परिसरात पाणी आले आहे.

उजनीची दुपारी एकची स्थिती 7 ऑगस्ट 2019

एकूण पाणीपातळीः 496.850 मीटर

ए.पाणीसाठाः 3326.77 दलघमी

उपयुक्त पाणीसाठाः 1523.96 दलघमी

टक्केवारीः 100.45 %

दौंड विसर्ग ः 99,687 क्युसेक

ग्लोबल न्युज नेटवर्क: