दोन रणजितसिंहांच्या तगाद्याने माढा मतदारसंघाला नीरेच्या पाण्याचा लाभ ,विजयदादांना मुख्यमंत्र्यांनी दिली वाढदिवसाची भेट

पार्थ आराध्ये

पंढरपूर : लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात गाजलेल्या नीरेच्या पाण्याचा प्रश्‍न मतमोजणीनंतर अवघ्या काही दिवसातच दोन रणजितसिंहांच्या तगाद्यामुळे जलसंपदा विभागाने सोडविला असून बारामती व इंदापूरला जाणार्‍या अतिरिक्त पाण्याला माळशिरस, फलटण, सांगोला व पंढरपूरकडे वळविण्याचा अध्यादेशच आता काढण्यात आला आहे.

दरम्यान यामुळे नीरा डावा कालवा लाभक्षेत्रात नाराजीचा सूर असला तर उजवा कालवा परिसरात मात्र आनंदाचे वातावरण आहे.माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाला सर्वाधिक मताधिक्क्य ज्या विजयसिंह मोहिते पाटील यांनी दिले त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी माळशिरस, माढा, सांगोला व फलटण तालुक्याला पाण्याची भेट दिली असल्याची चर्चा रंगली आहे.

वीर-भाटघर धरणाच्या उजव्या कालव्याद्वारे 57 टक्के व डाव्या कालव्याद्वारे 43 टक्के पाणी वाटपाचे धोरण 1954 च्या पाणी वाटप कायद्यानुसार ठरले होते. त्यानुसार उजव्या कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटण तर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना पाणी मिळत होते. डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला पाणी मिळत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली राजकीय ताकद वापरून 2009 मध्ये या पाणी वाटप करारात बदल केला. त्यामध्ये नीरा देवधर धरणाचे 60 टक्के पाणी डाव्या कालव्यातून बारामती व इंदापूर तालुक्याला व 40 टक्के पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला देण्याचा निर्णय घेतला. हा करार 3 एप्रिल 2017 पर्यंत होता. करार संपून ही आत्तापर्यंत डाव्या कालव्याला साठ टक्के पाणी सोडणे सुरूच होते.

नीरा उजवा कालवा हा माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असून यात फलटण, माळशिरस,सांगोला व पंढरपूरचा भाग आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपाचे उमेदवार होते व त्यांनी निवडणूक काळात बारामतीला जाणारे नीरेचे माढा मतदारसंघाचे हक्काचे पाणी परत आणण्याचे आश्‍वासन मतदारांना दिले होते व याच विषयावर त्यांनी पवार काका पुतण्यांवर टीका केली होती.

दरम्यानच्या काळात रणजितसिंह मोहिते पाटील हे ही भाजपातच आल्याने या भागातून नीरेच्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाकडे तगादा लावण्यासाठी दोन मातब्बर तरूण नेते समोर आले व लोकसभा निवडणुकीत माढ्यात भाजपाचे कमळ फुलताच हा नीरेच्या पाण्याचा विषय दोन्ही रणजितसिंहांनी ऐरणीवर आणला व निकाल लागताच काही दिवसातच बैठक झाली व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी डाव्या कालव्याच्या पाण्याचा करार संपल्याने देवधर धरणाचे पाणी आता उजवा कालव्यावरील लाभक्षेत्राला देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.

यामुळे सहाजिकच पवार ही नाराज झाले होते व त्यांनी पाण्याचे राजकारण करू नका असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री गिरीश महाजन महाजन यांना केले होते.

यानंतर आज 12 रोजी जलसंपदा विभागाने 60 टक्के पाणी हे उजवा कालव्याला देण्याचे आदेश काढले आहेत. दरम्यान मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने नीरा खोर्‍यात ही पाणीटंचाई आहे व सतत कालव्यात पाणी सोडण्यासाठी आंदोलन झाली आहेत. माळशिरस, फलटण, सांगोला व पंढरपूरचा जो भाग नीरा उजवा कालव्यावर आहे अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे. आता या भागाला जास्त पाणी मिळणार असल्याने येथे आनंदाचे वातावरण आहे. राज्य सरकारने कोणत्याही दबावाखाली न येता उजवा कालवा लाभक्षेत्राला साठ टक्के पाणी देण्याचा निर्णय घ्यावा व यात बदल करू नये यासाठी सांगोल्यात चार दिवसापूर्वीच भाजपा कार्यकर्ते व शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते.

हा आदेश निघाल्याने सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला करार संपून ही सोडले जाणारे नियमबाह्य पाणी बंद होऊन ते आता फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या माढा मतदारसंघातील भागाला मिळणार आहे. आत्तापर्यंत या धरणातून 60 टक्के म्हणजेच सहा टीएमसी पाणी बारामती व इंदापूर तालुक्याला आणि 40 टक्के पाच टीएमसी पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळत होते.

आता संपूर्ण अकरा टीएमसी पाणी फलटण, माळशिरस, सांगोला, पंढरपूर तालुक्याला मिळणार आहे. यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात आनंदाचे वातावरण पसरले आहे तर बारामती व इंदापूर भागात नाराजीचा सूर आहे. नीरेच्या पाण्यावर त्या भागात ही शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. आता त्यांच्यासमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकणार आहे.

धिरज करळे: