देवेंद्र फडणवीस यांचा राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द ,आता काळजीवाहू मुख्यमंत्री

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे फडणवीसांनी राजीनामा सुपूर्द केला असून राजीनामा देताना भाजपाचे महत्वाचे नेतेदेखील उपस्थित होते. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असताना तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. 

यावेळी भाजपचे चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड हे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासोबतच मंत्रिमंडळही बरखास्त झालं आहे. आता राज्यपाल नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू सरकार चालवा, अशी विनंती करू शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे नवं सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितले आहे.

विधीमंडळाचे सचिव अनंत कळसे म्हणाले की, नवं सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना अधिकार दिले जातील, मात्र त्यांना कोणतेही धोरणात्मक अधिकार मिळणार नाहीत.  महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष अंतिम टप्प्यात आला असून आज रात्री 12 वाजता विधानसभेची मुदत संपत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: