जोडीदार असतो कश्याला ? एकमेकांची सुखदुःख वाटून घायलाच ना? पिरियड आणि पती-पत्नी

पहाटेचे अडीच वाजायला आले होते, अमोली उठून बाथरूमला गेली, परत येऊन तिने बेडरूमची छोटी लाईट चालू केली आणि तिच्या कपड्याच्या कपाटात ती काहीतरी शोधू लागली. तिची शोधाशोध बराच वेळ चालू होती.

हळूहळू माझ्या डोळ्यावरची झोप कमी होत होती. मला त्या लाईटच्या प्रकाशाचा ञास होऊ लागला. मी चिडून तिला म्हणालो. ” आग झोप ना, काय करतं बसली आहेस एवढ्या रात्री?” त्यावर ती माझ्याकडे पहात. ” काही नाही रे !” एवढंच बोलली, आणि परत कपड्याच्या ढीगाऱ्यात काहीतरी शोधू लागली. सगळीकडे शोधून झाल्यावर हताश होऊन तिने कपाटाचे दारं बंद केले आणि बेडजवळ येऊन मला म्हणाली.

“वेदू अरे मला पीरियड आली आहे.” अमोलीच ते वाक्य कानावर पडल्या बरोबर मी प्रश्नार्थक नजरेनी तिला पाहत ” मग? ” एवढच म्हणालो. ती अपराधीपणे माझ्याकडे पाहत मला म्हणाली. “अरे पॅड नाही घरात एक पण, प्लीज रोडवरच्या मेडिकलवर जाऊन घेऊन येतोस का?“ मी आश्चर्याने तिच्याकडे पाहत तिला म्हणालो. “अमोली आग किती वाजले आहेत बघ जरा ! सॉरी यार मी नाही जाऊ शकत.” एवढं बोलून मी खाली सरकलेली चादर अंगावर ओढली आणि अमोली कडे पाठ फिरवली.

पीरियडमुळे अवघडलेली अमोली क्षणभर विचार करतं जागेवरच थांबली. मी हेतुपुरस्सर तिच्याकडे दुर्लक्ष केलं.पुन्हा ती तिच्या कपाटाकडे जाऊन काहीतरी उचकपाचक करतं असल्याच मला जाणवलं. कांही वेळानी कात्रीने कापड कापल्याचा आवाज माझ्या कानावर पडला, साधारण पाच मिनिटाचा अवधी निघून गेला. तिने काय केलं मला काही कळलं नाही, लाईट बंद करून ती माझ्या बाजूला येऊन झोपली.

माझी पाठ तिच्या बाजूला होती. ती माझ्या पाठीलाच बिलगली आणि आपले ओठ माझ्या कानाजवळ आणून हळू आवाजात मला म्हणाली. “वेद प्लीज मला जवळ घे ना !” झोप अर्धवट झाल्यामुळे माझी चिडचिड झाली होती. माझ्या अंगावरचा अमोलीचा हात बाजूला करतं मी जरा चिडक्या स्वरातच तिला म्हणालो “अमोली झोपू दे यार मला, बाजूला हो !” अमोली निमूटपणे माझ्यापासून बाजूला झाली आणि आपल्या दोन्ही हाताची बोटं छातीवर एकमेकात गुंफून छताकडे पाहत तिने एक दीर्घ सुस्कारा सोडला.

माझ्या डोळ्यावरची झोप आता पूर्णपणे नाहीशी झाली होती. उगीच डोळे बंद करून झोपेची वाट बघत होतो. एकदम अमोलीच्या विव्हळण्याचा आवाज आला म्हणून मी कूस बदलून तिच्याकडे पाहिलं, आता तिची पाठ माझ्याकडे होती. गुडघ्यात पाय दुमडून तिने आपलं पोट दोन्ही हातात गच्च पकडून ठेवलं होत. शरीराचा मुटका करून बेडच्या एका किनाऱ्यावर अमोली शांत पहूडली होती.

मधेच पोटावरचा तिचा हात कंबरेवर फिरतं होता.ती आपल्याच हाताने कंबरेवर दाब देत होती. हळू – हळू पिरियड चा त्रास तिला जाणवत होता. तिचं विव्हळणं चालूच होत. अमोलीच्या या दुखण्याला मी काय करणार ! असा विचार करून, मी आपला गुपचूप डोळे लावून पडून राहिलो. ती पुन्हा माझ्या जवळ आली आणि वेद sssवेद, म्हणून मला दोन वेळेस आवाज दिला. मी आपलं झोपेतून उठल्याच सोंग केलं तेंव्हा अमोली खालावलेल्या स्वरातच मला म्हणाली, “माझी कंबर खूप दुखतेय दाबून देतोस का ?” मी कपाळावर आठ्यांच जाळं पसरून अमोलीकडे पाहत तिला म्हणालो, ” अमोली sss, सकाळी ऑफिस आहे मला. झोपूदे ना शांततेत. माझ्या त्या उत्तराने अमोली अबोल झाली. तिच्या डोळ्याच्या पाणावलेल्या कडा मला अंधारातही स्पष्ट दिसून आल्या. मी त्याकडे साफ दुर्लक्ष करून स्वतःला चादरीत गुंडाळून घेतले.


माझ्या मोबाईलवर सहाचा अलार्म वाजला तशी मला जाग आली. मी उठून बेडवर बसलो आणि माझं लक्ष अमोलीवर गेलं. समोरच दृश्य बघून मला गरगरल्या सारखच झालं. मागच्या बाजूने अमोलीचा गाऊन रक्ताने ओलाचिंब झाला होता, खालच्या बेडशीटलाही रक्त लागलं होत. अमोली मात्र गाढ झोपेत होती. माझी नजर तिच्या चेहऱयावर स्थिरावली, तिचा चेहरा निस्तेज दिसतं होता.

पहाटे तिला बराच त्रास झाला असावा, कदाचित तिला आताच शांत झोप लागली असेल. असा विचार माझ्या मनात चालू होता पण समोरचे रक्ताचे डाग बघून अमोलीचा रागही आला होता. मी अमोली sss म्हणून जरा रागानेच तिला आवाज दिला. शांत झोपलेली अमोली माझ्या आवाजाने दचकून जागी झाली. रक्ताने डागाळलेल्या बेडशीट कडे हात दाखवून, ” हे काय आहे?” म्हणून मी तीला विचारले.

अमोलीने ते बेडशीटवरचे रक्ताचे डाग, स्वतःचा गाऊन सगळं पाहिलं, ते बघून तिला एकदम अपराध्यासारखं वाटू लागलं. कशीतरी माझ्या नजरेला नजर देत ती म्हणाली, ” मी काय करू वेद मला नाही रे कापड घेता येतं, तुला म्हटलं होतं मला पॅड आणून दे. जा ना प्लीज आता तरी घेऊन ये ! ” तिच्या या बोलण्यावर माझं डोकंच सरकलं, जवळ जवळ मी तिच्या अंगावरच जात तिला म्हणालो, ” मुर्खासारख काहीही काय काम संगतीयेस ग? तुझं तू घेऊन ये ना जाऊन, तुला ह्या असल्या गोष्टी जरा आधी आणून ठेवायला काय होतं? डेट्स माहिती नसतात का स्वतःच्या स्वतःला?” अमोली शांतपणे बेडशिट काढतं होती.

मी कसलाही विचार न करता फाडफाड बोलून टॉयलेट मध्ये निघून गेलो. दहा मिनिटांनी परत आलो तेंव्हा बेड आणि अमोली दोघेही चकचकीत झाले होते आणि अमोली किचन मध्ये माझा टिफिन तयार करतं होती. मी माझ्या तोऱ्यातच अंघोळीला निघून गेलो. सगळं आटोपून रोजच्यासारखं जाऊन डायनींग टेबल वर बसलो. अमोलीन गरमागरम उपीट पुढ्यात आणून ठेवलं.

ते पोटात ढकलून मी जायला निघालो, टिफिन घायला किचन मध्ये गेलो अमोली पोळ्या करतं होती. ती पाठमोरी उभी होती. मी काहीतरी घ्यायला म्हणून सहजचं खाली वाकलो तेंव्हा माझं लक्ष तिच्या पायावर आलेला रक्ताच्या ओघळाने वेधून घेतलं. अमोलची टाच त्या रक्ताने लालबुंद झाली होती. पुन्हा माझा रागाचा पारा चढला, मी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतं घराबाहेर पडलो.


ऑफिसला आलो होतो पण मन लागतं नव्हतं. परत-परत अमोलीचा चेहराच समोर येतं होता. किती विश्वासाने तिने माझ्याशी लग्न केलं होतं. केवळ दोनच वर्ष झाली होती आमच्या लग्नाला. ती माझी कित्ती काळजी घेते. मला काय हवं, काय नको हे तिला चांगलं ठाऊक आहे. आजपर्यंत ती कधीच माझ्या मनाच्या विरुद्ध वागली नाही. माझ्या तब्बेतीची तर माझ्यापेक्षा तीलाच जास्ती काळजी असते.

आजही चांगला आठवतोय मला मागच्या वर्षीचा एक किस्सा. किती पाऊस पडतं होता त्या रात्री, मी तापाने फणफणत होतो, रात्र बरीच झाली होती. अमोली सारखं माझं अंग थंड पाण्यानी पुसत होती. मधेच खिडकीतून पाऊस उघडायची वाट पाहत होती. तिची नुसती तगमग चालू होती. पाऊस काही उघडायचं नावं घेत नव्हता. ती त्या पावसात मी आलेच म्हणून घराबाहेर पडली आणि तेवढ्या रात्री जाऊन तिने माझ्यासाठी मेडिकल वरून औषध आणली होती.

औषध देऊन मला लहान मुलासारखं जवळ घेऊन झोपली होती. मलाही तिच्या उबदार कुशीत तेंव्हा चांगली झोप लागली होती. हे सगळं मला आठवतं होतं. मी आमोली सोबत रात्री पासून असा का वागलो याच उत्तर मात्र मला सापडतं नव्हतं. केवळ तिने मला सॅनिटरी पॅड आणायला सांगितले म्हणून तर नाही ना आपण असे वागलो तिच्याशी? हा प्रश्न मी माझ्या अंतरमनाला विचारला तेंव्हा आतून त्याने अगदी बरोबर उत्तर दिलं. हो तिने तुला पॅड आणायला सांगितले म्हणूनच तुझा पुरुषी अहंकार दुखावला.

पॅड आणणे हे काय पुरुषाचे काम आहे का ? परत तो पुरुषी अहंकार मला हेच सांगत होता. मी क्षणात त्याला बाहेर ओढला आणि पायाखाली घालून कचकच तुडवला. अमोलीचा निस्तेज चेहरा मला समोर दिसतं होता. रात्री तिला मी पॅड आणून दयायला पाहिजे होते. तिला जवळ घेऊन झोपायला हवं होतं, तिची कंबर दाबून दयायला पाहिजे होती.

सकाळी किती ब्लडींग झालं होतं तरीही तिने मला नास्ता, टिफिन दिलाच ना, पण मी तिच्यासाठी जाऊन पॅड नाही आणू शकलो, मग खरंच मी नक्की पुरुष आहे का? हाच मला प्रश्न पडला. कसली लाज होती मला जाऊन पॅड मागायला. मेडिकल मध्ये स्त्री असली तरी वर तोंड करून मी तिला कंडोम मागतोय की. मग पॅड मागायला कसली लाज होती.

अमोलीला थोडंच माहित होतं आज पिरियड येणार आहेत म्हणून, बरं असेलही कदाचित तिची तारीख. घरात पॅड आहेत म्हणून आणायचे विसरली असेल ती. डोक्यात सगळा गोंधळ उडाला होता. अमोली काही नजरेसमोरून बाजूला जात नव्हती, बॅग घेतली आणि तडक घराकडे निघालो. जाता-जाता एका मेडिकलवर थांबलो आणि तिथून एक भला मोठा सॅनिटरी पॅड चा पॅक घेतला. तेवढा मोठा पॅक माझ्या हातात पाहून सोसायटीतले पुरुष माझ्याकडे पाहून कुत्सितपणे हसतं होते.

तर बायकांचा प्रतिसाद संमिश्र मिळत होता. कुणाला माझा हेवा वाटतं होता, तर कुणाच्या चेहऱ्यावर बायकोचा बैल असं स्पष्ट दिसतं होतं. मी सगळ्यांना दुर्लक्षित करून डोअर बेल वाजवली. अमोलीने दार उघडलं. ती खूप थकली होती. मी तो भला मोठा पॅक सोफ्यावर ठेऊन अमोलीला जवळ घेतलं प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिच्या माथ्यावर एक चुंबन घेऊन तिला ” सॉरी अमोली ” म्हणालो तेंव्हा तिच्या डोळ्यातले आनंदाश्रूं मोत्यासारखे माझ्या छातीवर पडतं होते.

अमोलीने तो सोफ्यावरचा पॅक उचलला आणि प्रेमाने आपल्या जवळ घेतला. मी मनाशी ठरवून टाकलं. या चार दिवसात अमोलीला कसलाच त्रास द्यायचा नाही. तिचं अंग चेपून द्यायच, जेवढं जमत तेवढ आपण तिला खायला करून द्यायच. शेवटी लोक बायकोचा बैल म्हणाले तरी चालेल. जोडीदार असतो कश्याला ? एकमेकांची सुखदुःख वाटून घायलाच ना?

                 प्रेम सावंत.

माझी ही कथा वाचून एक जरी पुरुष त्या चार दिवसात स्त्रीला जपू लागला तर ही कथा लिहिण्यामागचा माझा हेतू संपन्न झाला असे मी समजेन.

ग्लोबल न्युज नेटवर्क: