हिंदू साम्राज्याचा ध्यास घेऊन कायम अपराजित राहिलेला अजिंक्य सेनानी ,वाचा सविस्तर-

श्रीमंत बाजीराव पेशवे

18 अॉगस्ट 1700 – 28 एप्रिल 1740

अजिंक्य

अजिंक्य सेनानायक श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा आज जन्मदिवस . त्यांच्या प्रेरणादायक स्मृतीस विनम्र अभिवादन !!

सुमारे तीनशे वर्षांपूर्वी दि.17 एप्रिल 1720 रोजी बाजीराव बाळाजी भट उर्फ बाजीराव बल्लाळ पेशवेपदी विराजमान झाले . हिंदू पद पातशाही आणि हिंदू साम्राज्याचा ध्यास घेऊन कायम अपराजित राहिलेले अजिंक्य सेनानी श्रीमंत बाजीराव पेशवे .

2 एप्रिल 1720 रोजी बाजीरावांचे तीर्थरूप , पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या दुःखद निधनानंतर छत्रपती शाहू महाराजांनी त्यांचे चिरंजीव बाजीराव यांची पेशवे पदावर नियुक्ती केली . त्यानंतर पेशवेपद वंशपरंपरागत भट घराण्याकडे राहिले . बाजीराव मृत्यूपर्यंत पेशवेपदी राहिले . मराठा साम्राज्याचा विस्तार करण्याचे बहुमोल कार्य बाजीरावांनी केले . आपल्या पेशवेपदाच्या करकीर्दीत बाजीराव एकही लढाई हरले नाहीत . ब्रिटिश फिल्ड मार्शल बर्नार्ड माँटगोमेरी – ” Bajirao was possibly the finest cavalry general ever produced by India . “

बाजीरावांचा जन्म दि.18 अॉगस्ट 1700 रोजी चित्पावन ब्राह्मण भट घराण्यात झाला . श्रीमंत पेशवे बाळाजी विश्वनाथ यांचे ते सुपुत्र . त्यांचे कनिष्ठ बंधू चिमाजी अप्पा हे ही त्यांच्या सारखेच पराक्रमी होते . बाजीराव आपल्या वडिलांच्या लष्करी मोहिमेत सामील होत असत . मुघल सत्ता उखडून टाकून अखंड हिंदुस्थानात हिंदू पद पातशाही , हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची महत्वाकांक्षा ते बाळगून होते . ढासळत्या मुघल साम्राज्याला आक्रमकपणे धक्का देऊन नेस्तनाबूत करण्याची मनिषा ते बाळगून होते . हल्ला , हल्ला मुळांवर सारखा हल्ला करीत रहा म्हणजे कितीही विशाल असला तरी तो वृक्ष कोसळतोच हे त्यांचे तत्त्व होते .

पेशवेपदी नियुक्त झाल्यावर बाजीरावांसमोर खडतर आव्हाने उभी होती . तरुण वयात झालेल्या त्यांच्या पेशवेपदी नियुक्तीमुळे नारो राम , अनंतराम सुमंत , श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांसारखी ज्येष्ठ मंडळी नाराज होती . आपल्या सारखेच तरुण आणि धडाडीचे योद्धे मल्हारराव होळकर , राणोजी शिंदे आदिंना त्यांनी हाताशी धरून त्यांना मराठा साम्राज्याच्या विस्तारात सहभागी करून घेतले . तेव्हा ही सर्व मंडळी विशीतले तरुण होते .

मोगलांचा वजीर निजाम उल मुल्क असफ जहाँ दक्षिणेत स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करून दख्खनवर प्रभुत्व मिळविण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांसमोर नव नवीन आव्हाने उभी करत होता .

नवीन ताब्यात आलेल्या माळवा व गुजरातची घडी बसवायची होती .

सिद्दीचा जंजिरा या सारखे मराठा साम्राज्यातले प्रांत जरी मराठा साम्राज्यात असले तरी त्यावर पेशव्यांचे पूर्ण नियंत्रण नव्हते .

आपल्या कारकीर्दीत बाजीराव या सर्व आव्हानांना पुरून उरले . वयाच्या केवळ चाळीसाव्या वर्षी दि.28 एप्रिल 1740 रोजी या महान सेनानायकाचा दुर्दैवी मृत्यू झाला .

बाजीराव सहा फूट उंच होते . तेजस्वी पण सतत रणांगणात असल्यामुळे रापलेली कांती बाजीरावांना शोभून दिसत असे . पांढरे शुभ्र आणि फिक्या रंगाचे कपडे त्यांना पसंत होते . संपूर्ण सेनेला त्यांनी आपल्या करड्या शिस्तीत ठेवले होते . त्यांच्या विरश्रीयुक्त भाषणांनी सैन्यात उत्साहाची लाट पसरत असे .

त्यांची पालखेडची लढाई हे युद्धशास्त्रातील एक उत्कृष्ट उदाहरण आहे . अमेरिकन सेनेत ते रोल मॉडेल आहे आणि त्या धर्तीवर सैनिकांना युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिले जाते .

अटक पासून कटक पर्यंत भगवा फडकवायचा आणि भारतवर्षात हिंदू पद पातशाही , हिंदू साम्राज्य प्रस्थापित करण्याचे युगपुरूष शिवाजी महाराजांचे स्वप्न बाजीरावांनी बऱ्याच प्रमाणात सत्यात उतरवले होते .

तरुण तडफदार बाजीरावांनी तीन दिवस दिल्लीला ओलीस धरले होते . लाल किल्ल्यातून बाहेर पडण्याची मुघल बादशहाची हिंमत झाली नाही . औरंगजेबाचा नातू दिल्लीहून पलायनाच्या विचारात होता . आपली ताकद दाखवून बाजीराव परत फिरले .

दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश कमांडर जनरल माँटगोमेरी यांनी ” हिस्ट्री अॉफ वॉरफेयर ” या आपल्या पुस्तकात बाजीरावांची मुक्त कंठाने स्तुती केली आहे . विजेच्या चपळाईने अत्यंत तेज आक्रमणाच्या बाजीरावांच्या शैलीचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे . हे पुस्तक ब्रिटन मध्ये ‘ डिफेन्स स्टडीज कोर्स ‘ मध्ये शिकवले जाते . हीच युद्धशैली दुसऱ्या महायुद्धात ‘ ब्लिट्झक्रिग ‘ म्हणून वापरली गेली .

बाजीरावांचे युद्ध रेकॉर्ड भारतातल्या सर्व सेनानायकांपेक्षा अव्वल दर्जाचे मानले जाते . चाळीस पेक्षा जास्त लढाया ते लढले आणि एकही हरले नाहीत .

नर्मदेपार सेना घेऊन जाणारे आणि चारशे वर्षांच्या यवनी सत्तेला दिल्लीत जाऊन ललकारणारे बाजीराव हे पहिले मराठा सेनानी होते .

बाजीरावांनी गुजरात , माळवा , बुंदेलखंड जिंकले नसते आणि नर्मदा आणि विंध्य पर्वतातून येणारे सर्व मार्ग आपल्या ताब्यात घेतले नसते तर पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी , अकबर औरंगजेबासारख्या आक्रमकाचे विशाल सेनेसह आक्रमण अटळ होते .

आपल्या पदरच्या सेनापतींच्या शौर्याची बाजीरावांना कदर होती . इतिहासात मराठी साम्राज्याची ताकद म्हणून पुढे आलेले होळकर , शिंदे , पवार , गायकवाड आदि घराणी बाजीरावांची मराठा साम्राज्याला देणगी आहेत . ग्वाल्हेर , इंदूर , धार , देवास , पुणे , बडोदा अशी शक्तीस्थाने मराठा साम्राज्यात बाजीरावांमुळेच अस्तित्वात आली .

बाजीराव हे पहिले असे योद्धे होते ज्यांचा शिक्का सत्तर ते ऐंशी टक्के भारतावर चालत होता . मोगल साम्राज्याला त्यांनी दिल्ली आणि आसपासचा प्रदेश एवढेच सिमित ठेवले होते . बाजीरावांनी निजाम , मोगलांसह पोर्तुगीजांवरही कितीतरी वेळा मात केली होती . छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत पेशवे म्हणून संपूर्ण देशात बाजीरावांनी आपली जरब बसवली होती .

हिंदू पद पातशाहीचा सिद्धांत सर्वप्रथम बाजीरावांनी मांडला . प्रत्येक हिंदू राजाला अर्ध्या रात्री मदत करायला ते तत्पर असत पूर्ण देशाचा बादशहा एक हिंदू असावा हे त्यांचे लक्ष्य होते . बाजीरावांच्या छत्रछायेखाली बुंदेलखंडाची रियासत जिवंत होती . छत्रसालाच्या मृत्यूनंतर त्याचा एक तृतीयांश हिस्सा बाजीरावांना मिळाला .

दिल्लीवर आक्रमण ही त्यांची अत्यंत साहसी चाल होती . छत्रपती शाहू महाराजांना ते नेहमी म्हणत मोगल साम्राज्याचा पाया दिल्लीवर आक्रमण केल्याशिवाय मराठ्यांची ताकद बुलंद होऊ शकणार नाही आणि दिल्लीला तर मी कधीही आपल्या पायाशी झुकवेन

महाराष्ट्र आणि अधिकांश पश्चिम भारत बाजीरावांनी मोगल आधिपत्यातून मुक्त केला होता . नंतर त्यांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे वळवला . मोगल बादशहाशी बगावत केलेला निजाम दक्षिणेतील मोठी ताकद होता . कमी सैन्य असूनसुद्धा निजामाला बाजीरावांनी कैक युद्धात हरवले होते आणि त्याच्यावर अनेक अटी लादल्या होत्या . बुंदेलखंडात त्यांनी मोगल सिपाहसालार मोहम्मद बंगशला हरवले होते .

इ.स.1728 ते 1735 च्या दरम्यान बाजीराव पेशवे अगणित लढाया लढले . पूर्ण माळवा , गुजरात ताब्यात घेतला . बंगश निजामासारखे बडेबडे सिपाहसालार परास्त केले . औरंगजेबाचा बारावा वंशज मोगल बादशहा मोहम्मद शहाने बंगशला हटवून जयसिंहाला बाजीरावावर पाठवले . बाजीरावांनी त्यालाही हरवलं .

दि.12 नोव्हेंबर 1736 ला बाजीराव पेशव्यांनी पुण्याहून दिल्लीला कूच केले . आग्र्याच्या सादातवर त्यांचे आक्रमण रोखण्याची जबाबदारी होती . मल्हारराव होळकर आणि पिलाजी जाधवांची सेना यमुनेच्या दुआबात पोहोचली . त्यांना घाबरून सादातने दीड लाखांची फौज उभी केली . एका मोर्चावर एवढे सैन्य मराठ्यांकडे कधीच नव्हतं पण त्यांची रणनीती अजोड होती . रणनीतीप्रमाणे मल्हारराव होळकरांनी मैदान सोडले . बाजीरावांनी सादात खाँ आणि मोगल दरबाराला धडा शिकवण्याचा निश्चय केला . सर्व मोगल सैन्य आग्रा मथुरेत अडकले , इकडे बाजीरावांनी थेट दिल्लीवर धडक मारली . आजच्या ताल कटोरा स्टेडियमवर बाजीरावांनी आपली छावणी टाकली . दहा दिवसांचे अंतर बाजीरावांनी केवळ 48 तासात न थकता न थांबता केवळ पाचशे घोड्यांच्या साथीत पूर्ण केले . मोगल बादशहा बाजीरावांना इतक्या जवळ पाहून घाबरला . स्वतःला लाल किल्ल्यात सुरक्षित ठिकाणी कोंडून त्याने मीर हसन कोकाच्या नेतृत्वाखाली आठ ते दहा हजार सैन्याची तुकडी बाजीरावांवर धाडली . केवळ पाचशे मर्द गड्यांसह बाजीरावांनी या सेनेचा दारुण पराभव केला . 28 मार्च 1737 हा तो दिवस होता . मराठी सत्तेच्या पराक्रमाचा तो सर्वश्रेष्ठ दिवस होता . बाजीराव तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते . पुऱ्या दिल्लीला बाजीरावांनी एक प्रकारे बंधक बनवले होते .

दिल्लीहून निजामाच्या नेतृत्वाखाली मोगलांची विशाल सेना आणि दक्षिणेतून बाजीरावांची मराठी सेना दि.24 डिसेंबर 1737 ला भोपाळ येथे एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या मराठी सैन्याने मोगल सैन्याचा जबरदस्त पराभव केला . जीव वाचवण्यासाठी निजाम लगेचच तहासाठी तयार झाला . माळवा मराठ्यांच्या ताब्यात आला . खंडणी म्हणून पन्नास लाख रुपये बाजीरावांना द्यावे लागले . पुढचे अभियान पोर्तुगीजांविरुद्ध होते . कित्येक युद्धात त्यांनाही हरवून बाजीरावांनी आपली सत्ता प्रस्थापित केली होती .

बाजीराव पेशव्यांचे अल्पायुष्यात निधन झाले नसते तर अहमदशहा अब्दाली किंवा नादीरशहा डोईजड झाले नसते इंग्रज आणि पोर्तुगीज अशा पाश्चिमात्त्य सत्ता ही आपले बस्तान बसवू शकल्या नसत्या केवळ चाळीसाव्या वर्षी बाजीरावांचा मृत्यू ही भारत देशासाठी अत्यंत दुर्दैवी घटना होती .

छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज , श्रीमंत पेशवे बाजीराव , श्रीमंत पेशवे माधवराव आपल्या दुर्दैवाने अल्पायुषी ठरले अन्यथा आज वेगळाच इतिहास दिसला असता .

आपल्या देदिप्यमान पराक्रमाने मराठा साम्राज्य अतुलनीय उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ह्या अजिंक्य अपराजित योद्ध्यास त्रिवार मानाचा मुजरा !

  • देवाशिष धसे 🚩
ग्लोबल न्युज नेटवर्क: