जाणून घ्या ‘रॉकेट मॅन’ के. सिवन यांची कारकीर्द

भारताच्या महत्वकांक्षी अंतरराळ योजनांपैकी एक असलेल्या ‘चांद्रयान-2’कडे (chandrayaan 2) संपूर्ण जगाचे लक्ष लागले असतानाच विक्रम या लँडरशी इस्रोचा चंद्रापासून अवघ्या 2.1 किलोमीटरवर असताना संपर्क तुटला. इस्रो चे प्रमुख सिवन यांनीच विक्रम लॅण्डरचा संपर्क तुटल्याची घोषणा केली होती. त्यावेळीच त्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती. यावेळी पंतप्रधान मोदी हे बंगळुरूतील इस्त्रोच्या केंद्रामध्ये उपस्थित होते. अखेरच्या क्षणी निराशा हाती आल्याने इस्त्रो प्रमुख के. सिवन यांना आपल्या भावना अनावर झाल्या. मोदींनी त्यांना प्रेमाने मिठी मारत त्यांचे सांत्वन केले.या चांद्रयान मोहिमेमुळे के. सिवन हे देशात प्रकाश झोतात आले आहेत.

इस्त्रो प्रमुख के. सिवन यांचे संपूर्ण नाव डॉ. कैलाशवडिवू सिवन असे आहे. 14 एप्रिल, 1957 ला तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यात सराक्कलविलाई या गावातमध्ये शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. एका सरकारी शाळेमध्ये शिक्षण घेतलेल्या सिवन यांचा इस्त्रोच्या प्रमुखापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आणि तितकाच रोमांचकही आहे.


ग्रामीण भागातून पुढे आलेल्या सिवन यांना सुरुवातीच्या काळात अनेक आर्थिक अडचणी आल्या. सुरुवातीला त्यांना एस.टी. हिंदू कॉलेजात गणिताची निवड करावी लागली होती. गणितात ते हुशार होते. इतर चार विषयांतही शंभर टक्के गुण मिळाल्याने त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. त्यातून त्यांना मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामांकित संस्थेत प्रवेश मिळू शकला.

सिवन यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांना शेत जमिनीचा तुकडा विकण्याची वेळ आली. मिसाइल मॅन ए.पी.जे. अब्दुल कलाम ज्या मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) या संस्थेचे माजी विद्यार्थी होते. त्याच संस्थेत सिवन शिकले. कलाम हे चौथ्या बॅचचे विद्यार्थी होते तर सिवन हे 29 व्या बॅचचे विद्यार्थी होते. म्हणजेच कलाम यांच्यानंतर बरोबरच 25 वर्षांनी तेच विषय घेऊन सिवन यांनी एमआयटीमध्ये प्रवेश घेतला होता.

सिवन यांनी 1980 मध्ये ते हवाई अभियांत्रिकी विषयात मद्रास इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून पदवीधर झाले. नंतर त्याच विषयात आयआयएस्सी संस्थेतून पदव्युत्तर पदवी घेऊन, 2006 मध्ये मुंबई आयआयटीतून पीएचडी झाले.

इस्रोचे प्रमुख होण्याच्या आधी ते तिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक म्हणून काम करीत होते. हिंदुस्थानचाचा सर्वात शक्तिशाली असा जीएसएलव्ही (भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक) तयार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. सिवन यांनी इस्रोच्या अग्निबाणांच्या मार्गाचे सादृश्यीकरण करणाऱ्या सितारा या सॉफ्टवेअरची निर्मिती केली. फेरवापराच्या अवकाश प्रक्षेपकांची अतिशय आव्हानात्मक योजनाही त्यांच्याच प्रयत्नांमुळे पार पाडता आली.


1982 मध्ये सिवन इस्रोत काम करू लागले. त्यानंतर 36 वर्षांनी त्यांना इस्रोच्या प्रमुखपदाचा मान मिळाला. 2018 साली जानेवारी महिन्यात भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो या संस्थेची धुरा वर्षांत के. सिवन यांच्या हाती देण्यात आली आहे.

त्या आधी म्हणजेच 2017 मध्ये इस्रोने 104 उपग्रह एकाच वेळी सोडण्याचा जो विक्रम केला होता त्यात सिवन यांचा सिंहाचा वाटा होता. विशेष म्हणजे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक तयार करण्यातही त्यांचीच विशेष कामगिरी कारणीभूत ठरली, स्वदेशी क्रायोजेनिक इंजिने विकसित करण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळेच ते ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जातात.


सिवन यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 1999 मध्ये ‘डॉ. विक्रम साराभाई रिसर्च अवॉर्ड’, 2007 मध्ये ‘इस्रो मेरिट अवॉर्ड’, 2014 मध्ये सत्यभामा यूनिवर्सिटीद्वारे ‘डॉ. ऑफ सायन्स’ची उपाधीने त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘रॉकेट मॅन’ म्हणून ओळखले जाणारे सिवन यांना तमिळ क्लासिकल गाणे ऐकने आणि बागकाम करणे आवडते. 1969 मध्ये प्रदर्शित झालेला राजेश खन्ना यांचा ‘आराधना’ हा त्यांचा आवडता चित्रपट आहे.


=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.
@ग्लोबल मीडिया सोल्युशन्स.

ग्लोबल न्युज नेटवर्क: