जाणून घ्या,तुम्हाला माहीत नसलेल्या पंढरपूर जवळील या गावातील देशातील दुसऱ्या सूर्य नारायण मंदिराविषयी …!

भारत देशात देवदेवतांच्या मंदिरांची संख्या कमी नाही. वेगवेगळ्या राज्यात वेगळ्या नावाने मंदिरे आहेत. मात्र सूर्यनारायणाची मंदिरे ही देशात केवळ दोनच आहेत. यातील भारतातील जगप्रसिद्ध असे ओडिशा राज्यातील कोणार्क मंदिर येथील सूर्य नारायण मंदिर सर्वांना परिचित आहे. मात्र सोलापुर जिल्ह्यात सुद्धा एक सूर्य नारायण मंदिर आहे हे बऱ्याच जणांना माहित नाही. या लेखातून जाणून घ्या या मंदिराविषयी.

पंढरपूर तालुक्यात मोहोळकडे जाताना पंढरपूर पासून अवघ्या दहा किलो मीटर अंतरावर राज्यमार्गावर नारायण चिंचोळी हे गाव आहे. सोलापूर शहरापासून हे गाव साठ किलोमीटर अंतरावर आहे.

या गावात हे हेमाडपंथी मंदिर आहे. १९११ च्या शिरोगणतिनुसार या गावात सुमारे २२२५ लोकं पाचशेच्या उंबरठ्यात राहतात. प्रामुख्याने मराठा समाजाच्या या गावात इतर सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात व दिनचर्या निभावतात.

२०१३ साली या गावाला महात्मा गांधी तंटामुक्त पारितोषिकेने सन्मानित केलं आहे. या गावात हेमाडपंथी सूर्य नारायणाचे दुर्लक्षित मंदिर आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील सूर्य नारायणाची मूर्ती अप्रतिम असून नजरेत भरते. सामान्यपणे पाच फूट उंचीची ही उभी मूर्ती पंढरपुरच्या पांडुरंगाची प्रतिकृती वाटते. काळ्या सावळ्या रंगातील ही मूर्ती न्याहळल्यावर नखशिखांतात चैतन्य पसरते.

गाभाऱ्याच्या उंचीपर्यंत काळ्या पाषाणातील हेमाड बांधकाम असून त्याच्यावरील कळसापर्यंतचे बांधकाम मात्र अलिकडे झालेलं लक्षात येते. मंदिराच्या आवारातच डावीकडे मंदिराला चिकटून भग्नावशेषातील महादेवाचे मंदिर आहे. या मंदिरातील महादेवाचं पिंड (लिंग) वगळता वास्तूच्या बहुतांश भागाची पडझड झाली आहे.

मंदिर परिसरात अनेक काळ्या दगडातील सुबक मूर्ती व वीरग(ळ)ल (कन्नड भाषेत वीरगल्ल म्हणतात. वीर म्हणजे शूर व गल्ल म्हणजे दगड .. Brave stone)भग्नावस्थेत आढळून येतात.

दर वर्षी मकर संक्रांतीला या मंदिरात यात्रा भरते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला सूर्यकिरणोत्सव साजरा केला जातो. या दोन्ही उत्सवाला स्थानिक (तालुक्यातील) भाविक गर्दी करतात. दूरवरच्या लोकांना या मंदिराबद्दल फारशी माहिती नाही. मंदिरात दिननित्य पूजा अर्चा होतात.

१९९५ साली ऐकीव माहितीला प्रतिसाद देत मी पहिल्यांदा या मंदिराला भेट दिली. सुरेख कोरीव मूर्ती पाहून मोहित झालो. तेंव्हा पासून या सोलापुरला ये-जा करताना आवर्जून या मंदिरात जावून मूर्ती दर्शनाने पुलकित होऊन उत्साहित राहतो. कधीकाळी अस्तित्वात आलेले हे मंदिर दुर्लक्षित होते, मात्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय विजयसिंह मोहिते-पाटील हे पर्यटन‌ मंत्री असताना लक्षावधी रूपये खर्च करून मंदिर परिसर सुशोभित केला आहे.

आज अकलूज मधील माझे वास्तव्य कायमचे सोडून सोलापूर मार्गे परतताना सूर्यनारायणची विलोभनीय मूर्ती न्याहाळण्याचा मोह आवरला नाही. म्हणून आम्ही (दंपती) नारायण चिंचोळीच्या राजाचे दर्शन घेतलं. तुम्ही पण नक्कीच दर्शनाची संधी घ्या व पुनीत व्हा..‌

@डाॅ. अरविंद कुंभार, मुक्त पर्यावरण पत्रकार

======================= बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठी चे फेसबुक पेज व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा

ग्लोबल मीडिया सोल्युशन्स

ग्लोबल न्युज नेटवर्क: