जय हो ! जामगावच्या सुनबाई बनल्या कृषी मंडल अधिकारी

जय हो ! जामगावच्या सुनबाई बनल्या कृषी मंडल अधिकारी

बार्शी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य कृषि सेवा परीक्षा 2018 मध्ये तालुक्यातील जामगावच्या सुनबाई सुप्रिया दीपक नाईकनवरे यांनी यश मिळवले आहे. या परीक्षेत सुप्रिया यांची अनुसूचित जाती प्रवर्गात राज्यात 5 वा क्रमांक घेऊन कृषि मंडल अधिकारीपदी (वर्ग 2) नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल जामगांव ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्र मंडळीकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जामगावचे सुपुत्र आणि पुणे जलसंपदा विभागातील सहायक अभियंता असलेल्या दीपक नाईकनवरे यांच्या त्या पत्नी आहेत. तर, सार्वजनिक बांधकाम विभागात लिपिक म्हणून निवृत्त झालेल्या महादेव नाईकनवरे यांच्या त्या सुनबाई आहेत. सुप्रिया यांचे प्राथमिक शिक्षण उस्मानाबाद येथील आर्य चाणक्य स्कूल येथे झाले असून उस्मानाबाद येथील कृषि महाविद्यालयातून त्यांनी Bsc कृषी पदवी पूर्ण केली आहे.

त्यांनतर, राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून त्यांनी Msc कृषि पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं. लहानपणीपासूनच एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्या गावात नावलौकिक आहे.

जिद्द आणि चिकाटी असल्यास यश नक्कीच मिळते. ग्रामीण भागातील विशेषतः मराठवाड्यातील विद्यार्थयांनी योग्य मार्गर्दशन घेऊन स्पर्धा परीक्षात उतरावे, असे सुप्रिया यांनी बार्शी टाईम्स शी बोलताना म्हटले.

शेतकऱ्यांसाठी कामं करण्याची मोठी संधी मला मिळाली आहे, या संधीच मी सोनं करेल. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचं आणि सरकारी योजना शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहचविण्यासाठी मी कटिबद्ध असेल, असेही त्यांनी म्हटले. तर, आपल्या यशाच्या पाठीमागे पती दीपक ननवरे आणि वडील सुरेश शेरखाने यांचं मार्गदर्शन आणि साथ असल्याचंही त्यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: