मुंबई | राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून विधिमंडळ सचिवालयात जयंत पाटील यांचीच अधिकृत गटनेते म्हणून नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांनी याविषयी माहिती दिवली. राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीचे पत्र सोमवारी दिले. या पत्रानुसार जयंत पाटीलच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते असणार आहेत. त्यामुळे ते वा त्यांनी ज्यांची प्रतोद म्हणून निवड केली असेल त्यांचाच ‘व्हीप’ अधिकृत असतो.
विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांनी सांगितल्यानुसार, विधिमंडळ गटनेत्याची निवड पक्षाचा अध्यक्ष वा सरचिटणीस करत असतो. निवडीची माहिती 30 दिवसांत विधानसभा अध्यक्ष किंवा विधान भवनाच्या सचिवांकडे द्यावी लागते. शिवसेनेने गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केल्याचे पत्र देण्यात आले आहे. राज्यपाल व विधिमंडळ या दोन स्वतंत्र घटनात्मक संस्था आहेत. दोन्ही ठिकाणी गटनेता निवडल्याची माहिती देणे अनिवार्य असते. राष्ट्रवादीने राज्यपालांकडे कोणती माहिती दिली हे विधानसभाध्यक्षांना माहिती नसते.
राष्ट्रवादीने अजित पवार यांची निवड केल्याची माहिती अध्यक्षांना कळवण्यात आली नव्हते. त्यामुळे त्यांना विधिमंडळ गटनेता समजता येणार नाही. आता जयंत पाटील यांच्या निवडीची माहिती दिल्यामुळे तेच पक्षाचे विधिमंडळ गटनेते असणार आहेत. राष्ट्रवादीचे विधिमंडळ गटनेते म्हणून अजित पवार यांच्या नावाची नोंद पक्षाने विधान मंडळाकडे करण्यात आलेली नव्हती. काँग्रेसने अजूनही गटनेता निवडलेला नाही. ही निवड कधी करायची हा पक्षाचा अधिकार असतो.