जनतेने संधी दिल्यास तीन वर्षात उपसा सिंचन चे काम पूर्ण करू:राजेंद्र राऊत

विरोधक निवडणुका आल्या की सक्रिय होतात असा केला आरोप

बार्शी : बार्शी उपसा सिंचन योजनेचे काम २३ वर्ष झाली तरी अदयाप पूर्णत्वाला गेले नाही. यास विरोधकांची निष्क्रीयता कारणीभूत असल्याचा आरोप करत जनतेने संधी दिल्यास तीन वर्षात या योजनेचे काम पूर्ण करू. तालुक्यात एमआयडीसीच्या माध्यमातून मोठे उदयोग आणून बेरोजगारांसाठी संधी उपलब्ध करून देवू. शेतीला पाणी व एमआयडीसीच्या माध्यमातून उदयोग यावेत यासाठीच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांनी केले.

तालुक्यातील आगळगांव येथील विठ्ठल-रूक्मीणी मंदीरात श्रीफळ वाढवून राऊत यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराचा प्रारंभ केला. याप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डमरे गुरूजी होते.

माजी आ. राजेंद्र राऊत म्हणाले, १९९९ पासून संघर्ष आपल्या पाचवीला पूजला आहे. २००४ ला आमदारकीच्या काळात ब्रॉडगेज रेल्वे, एमआयडीसी जागा संपादित करण्याचा तसेच ढाळे पिंपळगांव मध्यम प्रकल्पाचा अशी ठळक कामे मार्गी लावली. नंतरही अपयश पदरी आले तरी जनतेप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून सतत विकासकामासाठी प्रयत्नशील राहिलो. तालुक्यातील शेतीला पाणी मिळाले, मोठे उदयोग येथे आले तरच येथील बाजारपेठेला चालना मिळणार आहे.

त्यामुळे उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला नेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. एमआयडीसीचे माध्यमातून मोठे उदयोग येथे आणण्यावर आगामी काळात आपला भर राहील. जनतेने संधी दिल्यास सहा महिन्याच्या आत उपसा सिंचन योजनेची पाणी तावडी तलावात, दीड वर्षात ढाळे पिंपळगांव मध्यम प्रकल्पात तर तीन वर्षात कोरफळेच्या शिवारात पाणी नेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.

राऊत पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यातून नगरपालिकेच्या माध्यमातून अवघ्या अडीच वर्षात शहरासाठी सुमारे ५०० कोटी रूपयांचा विकासनिधी मिळवला. त्यातून शहरात भुयारी गटार, सुसज्ज असे भगवंत स्टेडियम, बागा, रस्ते अशी विकासकामे सुरू आहेत. याच विकासकामांची उदघाटने केली. याचा पाठपुरावा केलेली पत्रे आपल्याकडे आहेत.

विरोधक मात्र विकासकामांच्या उदघाटनावर टीकाटिपण्णी करून जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील रस्ते, तसेच तालुक्यातील चिंचोली-ढेंबरेवाडी, रऊळगांव, संगमनेर, मालेगांव, सुर्डी अशा पाच साठवण तलावाचे तसेच बंधाऱ्याचे प्रश्न मार्गी लावले. जलयुक्त शिवार योजनेला तालुक्यात गती देण्याचा प्रयत्न केला. बाजार समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावांत जलसंधारण मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला. हजारो एकर शेतजमीन यामुळे ओलिताखाली येणार असल्याचे सांगितले. विरोधक मात्र निवडणूका जवळ आल्या की सक्रीय होतात अशी टीका केली.

यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले म्हणाले, विरोधकांनी सहकाराच्या माध्यमातून पिळवणूक केली. विरोधकाच्या ताब्यात आता या संस्था राहिलेल्या नाहीत. विरोधकाच्या अनेक वर्षाच्या राजकारणाची शेवटची घटका या निवडणूकीच्या निमीत्ताने आलेली आहे तालुक्याच्या व जिल्हयाच्या दृष्टीने एक दिशा बदलणारी ही निवडणूक आहे. राऊत यांनी माजी आमदार असताना लोकप्रतिनिधी असल्याप्रमाणे जबाबदारी पार पाडली असे सांगत सहकार्याचे आवाहन केले.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, जि.प.सदस्य किरण मोरे, भराटे गुरूजी, कपिल कोरके, बाबासाहेब कथले, संतोष निंबाळकर, दलित महासंघाचे सुनिल अवघडे, केशव घोगरे, संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पंचायत समितीचे उपसभापती अविनाश मांजरे, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, माजी उपसभापती कुंडलिक गायकवाड, बाजार समिती संचालक रावसाहेब मनगिरे, नगरसेवक प्रशांत कथले, पांडुरंग गव्हाणे, आनंद कोरके, सचिन मडके, शंकर वाघमारे, प्रकाश मनगिरे यांच्यासह नगरसेवक, जि.प.सदस्य आजी, माजी पदाधिकारी, बाजार समिती संचालक आदी उपस्थित होते.

::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

ग्लोबल न्युज मराठी वरील विविध लेखांचे आणि ताज्या बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा-
facebook.com/globalnewsmarathi

ग्लोबल न्युज नेटवर्क: