जगू या, जिंकू या! मी आहे यार, कारण तू आहेस. आपण आहोत ; वाचावे असे काहीतरी

जगू या, जिंकू या!

  • संजय आवटे

सलमान खान हा काही विचारवंत वगैरे अभिनेता नव्हे. पण, त्याच्या एका मुलाखतीनं मला पार हादरवून टाकलं.
त्याला विचारलं गेलं होतंः “तुझं दुःख तू कोणाशी शेअर करतोस?” तोवर पोरकट हसत जोक्स मारणारा सलमान एकदम थबकला. गंभीर झाला.

म्हणाला, “कोणाशीच नाही! कारण समजा मी माझ्या सहका-यांसोबत दुःख शेअर केलं, तर ते मला समजावतील. पण, खासगीत हसतील. माझा रडका चेहरा बघून खुश होतील.”

“माझ्या काही मित्रांशी मी ते शेअर करू शकतो. पण, मला भीती आहे की, त्यांना याचाच आनंद होईल की साक्षात सलमान आपल्याशी एवढं पर्सनल काही शेअर करतोय!”

“माझ्या खांद्यावर हात ठेऊन, मला समजावताना काही लोकांचा इगो सुखावेल.”

“आईसारखे काही खूप जवळचे लोक आहेत, ज्यांच्याशी मी हे शेअर करू शकतो. पण चिंता अशी आहे की, हे लोक त्यामुळे स्वतःच एवढे निराश होतील, की मला भीती वाटते.”

“त्यामुळे अद्याप तरी मला असं कोणी मिळालेलं नाही की ज्यांच्याशी मी माझं दुःख शेअर करू शकेन!”


मनातला हा अंधार खरंच कोणासोबत शेअर करायचा?

आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात अंधार आहे. पण, हा अंधार दाखवणारी कोणती ‘इमोजी’ नाही. तो व्यक्त करण्याची कोणाची तयारी नाही. तुझ्या अंधाराशी मी काही नातं सांगत नाही. आणि, माझ्या अंधाराशी तुझा जैव संबंध नाही!
आपल्याही नकळत या अंधाराचं मोठं साम्राज्य तयार झालं आहे, हे आपल्या गावीही नाही.

काही लोक निराश आहेत, खोल डिप्रेशनमध्ये आहेत, हे आपल्याला समजत नाही, असं नाही. पण, उलटपक्षी अनेकदा त्याचं ‘गॉसिप’ होतं, थट्टा होते आणि ‘बरं झालं, आपल्या रस्त्यातला एक स्पर्धक दूर झाला’, असंही लोकांना वाटतं.

तुम्हाला गंमत माहीत आहे? तुम्ही एखाद्या दिवशी ऑफिसमध्ये निराश दिसलात, थकलेले जाणवलात तर लोकांना काळजीच वाटेल, असं नाही. ‘त्याला प्रमोशन नाही मिळत बरं का, बघितलंस ना चेहरा कसा रडवेला दिसत होता त्याचा’, असं गॉसिप होणारच नाही, असं नाही.

कला ही आनंदाची सर्जक शक्यता. पण, आनंदाचे झरे फुलवणा-या या क्षेत्रातले लोक तर एकमेकांचं जगणं संपवून टाकण्यासाठी कसे आणि किती टपलेले असतात, हे तुम्हाला अगदी सामान्य तबलावादकांपासून ते साहित्यापर्यंत आणि गायकांपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्वदूर दिसेल. कुठलंच क्षेत्र इथं अपवाद नाही.

हा मानवी स्वभाव कसा आहे, तेच समजत नाही.

आपल्यासमोर आपला एखादा मित्र चालता चालता घसरून पडला, तरी ‘रिफ्लेक्स ॲक्शन’सारखे आपल्याला आधी हसू फुटते. मग आपण त्याला उठवण्यासाठी हात देतो!

मला आठवतं, लहानपणी आम्ही सगळेच मित्र सायकल शिकायचो. एखाद्यानं जरा भारीतली सायकल आणली असेल आणि थोडं स्टाइलमध्ये सायकल चालवत गावभर फिरत असेल तर “असा बाराच्या भावात पडावा लागतो ना…” अशी शुभेच्छा असायची!

माणसं दिसतात सोबत, पण किती जखमी करत असतात एकमेकांना! बोचकारत असतात. ओरबाडत असतात. घर नावाचं भारतीय प्रारूप हे तर ऊब कमी देतं आणि ऊर्जा अधिक शोषतं. नस्ते गुंते तयार करतं. सोपं जगणं क्लिष्ट करून टाकतं. कोणीच कोणाशी बोलत नाही. ‘डिप्लोमसी’ सुरू असते सगळी. जिथं ‘प्रेमात पडले’, हे पोरगी आईला सांगू शकत नाही, तिथं आणखी काय संवाद होणार? “माझ्याशी भांडायला, खुन्नस द्यायला मी काय भावकी आहे का त्याची?”, असं गावात सहजपणे बोललं जातं. अशा नात्यांचं काय करायचं?

आपल्यासारख्या आध्यात्मिक देशात तर हा भोंदूपणा भयंकर आहे. भौतिक गोष्टींचे आकर्षण नाही, असे म्हणायचे आणि प्रत्यक्षात मात्र त्यासाठी एकमेकांचा जीव घ्यायला सज्ज व्हायचे! प्रतिभा, प्रयत्न, प्राक्तन याच्या आधारावर प्रगती करण्याची आकांक्षा बाळगण्यात गैर काही नाहीच. पण, त्यासाठी माणसं खोडण्याची, भिंती बांधण्याची ही कसली विखारी विकृती?

अशा वेळी कोण कोणाशी बोलेल? संवाद कसा होईल?

जगणं हे मूलभूत आहे. प्रसिद्धी, पैसा, यश अशी आकांक्षा असू शकतेच, पण ते काही जगण्याचे प्रयोजन नाही. जगणे हेच जगण्याचे प्रयोजन आहे.

तुम्ही कलेक्टर आहात, स्टार आहात, मंत्री आहात, शिपाई आहात, उद्योजक आहात की शेतकरी आहात, यामुळे त्यात काही फरक पडत नाही.

मी बी.एस्सी (ॲग्री) केलं. आमच्याकडं सगळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे. माझ्या एकट्या बॅचचे पन्नासेक जण तरी आयआरएस, आयपीएससह क्लास वन ऑफिसर वगैरे असतील. काही ग्रामसेवक, काही कृषी पर्यवेक्षक, व्यावसायिक, एलआयसीत ऑफिसर, काही शेतकरीही. आमच्या बॅचचं ‘गेट टुगेदर’ दरवर्षी करायचं, अशी कल्पना दहा वर्षांपूर्वी पुढे आली. सुरूवातीच्या ‘गेट टुगेदर’मध्ये ‘वर्गवाद’ असायचा. डेप्युटी कलेक्टरला आपण ग्रामसेवकापेक्षा थोर असे वाटायचे. किंवा, त्याला नाही वाटले, तरी ग्रामसेवकाला न्यूनगंड असायचा. मग डीवायएसपी मोठा, सुपरवायझर बारका असे सगळे पोटभेद होते. गेल्या दहा वर्षांत सगळ्यांच्या लक्षात आलंय की यामुळं काही फरक पडत नाही, यार. तुझ्याकडे इनोव्हा असेल, माझ्याकडं बाइक असेल, पण त्यामुळं काय फरक पडतो? जगण्यातली धमाल महत्त्वाची. जगण्यावर हक्क प्रत्येकाचा आहे. टेरेस कोणाच्या मालकीचं असलं, म्हणून त्यावरून दिसणारं आकाश त्याच्या मालकीचं थोडंच आहे! आता अशी अवस्था आहे की आम्ही दोन वर्षांपूर्वी गोव्यात आणि गेल्या वर्षी दुबईत ‘गेट टुगेदर’ केलं, तेव्हा हे सगळे भेद मुळासकट उपटले गेले होते. ग्रामसेवक कमिशनरला ×××वर लाथ घालून बेडवरून उठवत होता!

आमचा एक मित्र कॉलेजात टॉपर होता. तो पुढं सायंटिस्ट वा आयएएस होणार, अशी आम्हाला खात्री होती. पुढं अगदी सामान्य मार्कांची पोरं एसपी, कमिशनर वगैरे झाली. हा मात्र गायक झाला. आर्थिक आघाडीवर यथातथाच राहिला. पण, तहानभूक हरपून गाताना तो केवढा देखणा दिसतो! पहिल्या भेटीत सगळ्यांनाच त्याच्या नव्या रुपाचा धक्का बसला. आता मात्र आमच्या ‘गेट टुगेदर’चा खरा ‘हीरो’ तो असतो! टॉपर असताना या ‘चष्मेबद्दू’ला कधीच हा सन्मान मिळाला नाही, जो त्याला आज मिळतो.
कोणाला काही त्रास होण्याचा, मदत हवी असण्याचा अवकाश, आमची सगळी फौज कोणत्याही मित्राला मदत करायला उभी असते. मैत्र हे असतं.

केशवसुत म्हणाले तेच खरं.
‘जग केवढं, ज्याच्या- त्याच्या डोक्याएवढं’

त्याचा पदाशी वा पगाराशी काही संबंध नाही. हे डोक रूंदावणं, मन विशाल करणं हेच गुपित आहे, तुमचं जग व्यापक करण्याचं. मग कळतं, जगण्यात मौज आहे. मुक्कामात नाही, प्रवासात गंमत आहे.

त्यासाठी आपलं जग तर बदलावं लागेलच, पण ‘माणूस’ म्हणून हा भवतालही बदलावा लागेल. आपली जगण्याची गोष्ट आहे, तशी प्रत्येकाच्या जगण्याची गोष्ट आहे. ती समजून घ्यावी लागेल. त्यासाठी कोणाच्या पश्चात नाही. त्याच्याशी थेट बोलावं लागेल. कोणाच्या शेतातला बांध जेसीबीनं उद्ध्वस्त करण्यापेक्षा या सीमा प्रश्नावर एकमेकांशी बोलावं लागेल.

“गैरों से कहा तुमने,
गैरों से सुना तुमने!
कभी हम से कहां होता,
कभी हम से सुना होता!”

हीच तर सल आहे.

तेव्हा, बोलू एकमेकांशी आणि मुख्य म्हणजे, एकमेकांशी बोलण्याचा अवकाश जिवंत ठेऊ. नाहीतर, सुशांतसारखे काही आत्महत्या करतील, उरलेले रोज मरत-मरत दिवस काढतील.

हे जग सुंदर करायचं असेल आणि ‘जगणेबल’ करायचं असेल, तर आधी छान निखळ माणूस व्हावं लागेल. माणसांची निरपेक्ष सोबत करावी लागेल. तुम्ही कोणावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही स्वतःवरही प्रेम करायला शिकता. तुम्ही कोणावर विश्वास ठेवता, तेव्हा तुमचा स्वतःवरचा विश्वास अढळ होत जातो. तुम्ही कोणाशी बोलता, तेव्हा स्वतःशीच बोलत असता! आपल्यामुळं कुणाचा गेम झाला, यापेक्षा आपल्यामुळं कोणाच्या चेह-यावर हसू फुललं, याचा आनंद किती थोर असतो! हेच तर जिंकणं आहे!

मी आहे यार, कारण तू आहेस. आपण आहोत.

सोबत राहू, असेच.
जगू या, जिंकू या!
Love u All

दिव्य मराठी चे संपादक संजय आवटे यांच्या फेसबुक वॉल वरून साभार

ग्लोबल न्युज नेटवर्क: