चलनबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा व्यवसाय संकटात आणण्याचे पाप भाजप सरकारने केले-शरद पवार

नाशिक: मोठया लोकांकडे काळा पैसा आहे. शेतकऱ्यांकडे कुठचा काळा पैसा. श्रीमंतांच्या काळ्या पैशाला हात लावला नाही. शेतकऱ्यांचा व्यवसाय चलनबंदीच्या माध्यमातून संकटात आणला आणि शेतकऱ्यांना संकटात आणण्याचे पाप भाजपा सरकारने केल्याची घणाघाती टीका शरद पवार यांनी केली.
ते निफाड येथे धनराज महाले यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

व्यापारी बांधव सुरुवातीला मोदी नावाचा गजर करत होते आणि आता मोदींना काढून टाकण्याचा विचार करत आहेत. नशीब कळंल बिचार्‍यांना की हा गडी आपला नाही… हा कुणाचाच नाही… शेतकऱ्यांचा नाही… व्यापाऱ्यांचा नाही… उद्योगधंद्यातील लोकांचा नाही… बेकारी वाढली हे केंद्र सरकारने जाहीर केले त्यामुळे नव्या पिढीचाही नाही… मग देश कुणासाठी द्यायचा यांच्या हातात. यांच्या हातात देश दयायचा म्हणजे मुठभर लोकांच्या हिताची जपणूक करणारे घटक आहेत त्यांच्या हातात देश देण्यासारखं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं.

आमचा संघर्ष होतो, परंतु आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला का सोबत घेतले. कारण ते शेतकऱ्यांसाठी संघर्ष करतात. कधी कधी आमच्यावरही टीका करतात परंतु टीका केली तरी विचार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असतो. त्यामुळे या सगळ्यांना बरोबर घेवून दिल्ली कशी नरमत नाही हे बघतो असे ही पवार म्हणाले.

या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करत काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.

admin: