गरीब नॉन-कोविड रुग्णांच्या कोरोना चाचणी व उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा- खासदार राहुल शेवाळे

गरीब नॉन-कोविड रुग्णांच्या कोरोना चाचणीचा आणि उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा- खासदार राहुल शेवाळे

सुरज गायकवाड

ग्लोबल न्यूज: राज्य सरकार आणि पालिकेची रुग्णालये कोविड रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आल्याने, गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड रुग्णांना, नाईलाजास्तव खासगी रुग्णालयात उपचारासाठी जावे लागत आहे. या नॉन-कोविड रुग्णांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली आहे.

राज्यभरातील सरकारी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. यामुळे, गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड (डायलिसीस, कॅन्सर आणि इतर रुग्ण) रुग्णांना या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाता येत नाही. अशा परिस्थितीत, नाईलाजाने या रुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे.

मात्र, इथे उपचार करण्यापूर्वी प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी खासगी लॅबकडून केली जात आहे. याचा खर्च सामान्य रुग्णांकडूनच वसूल केला जात आहे. खासगी कोरोना चाचणीचा खर्च आणि खासगी उपचाराचा खर्च असा नाहक भुर्दंड सामान्य रुग्णांना सोसावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीचा विचार करून, गरीब आणि मध्यमवर्गीय नॉन-कोविड रुग्णांची कोरोना चाचणी आणि त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारने करावा, अशी विनंती खासदार शेवाळे यांनी केली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: