कोरोनाच्या लढ्यात सरकार सपशेल अपयशी!

ग्लोबल न्युज : “कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढत असताना राज्यात कोरोनासंदर्भातील उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा पुरता बोऱ्या वाजला. महाविकास आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे जनतेचा नाहक बळी जाऊन लोकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे. कोरोनासंदर्भात उपाययोजना राबविण्यात हे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे,” अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

नगर येथे कोरोनाबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दरेकर येथे आले होते. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. कोरोनासंदर्भातील उणिवा, वस्तुस्थिती मांडली, की महाविकास आघाडीकडून “राजकारण करीत असल्याचा’ आरोप होतो; मात्र अशा आरोपांची पर्वा न करता वास्तव जनतेसमोर मांडत राहू, असे स्पष्ट करून दरेकर म्हणाले, “”नगर जिल्ह्यातील कोरोना, तसेच निसर्ग वादळाच्या नुकसानीचा आज आढावा घेतला. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना विविध ठिकाणी क्वारंटाईन करण्यात येते. कसलीही सुविधा नाही, नियम धाब्यावर बसवून कारभार चाललेला दिसतो.

नुकतेच शेवगाव तालुक्‍यातील एका मंगल कार्यालयात क्वारंटाईन ठेवलेले दोन जण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे अशा ठिकाणी क्वारंटाईन केलेल्या लोकांची सरसकट तपासणी करण्यात यावी. एकही क्वारंटाईन व्यक्ती सुटता कामा नये. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी खाटा, व्हेंटिलेटर आदी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा जीव जात आहे. हलगर्जीपणाने काम केल्यास कोरोनाचा प्रसार वाढण्यास वेळ लागणार नाही. केरळसारखे राज्य विविध यंत्रणांच्या माध्यमातून कोरोनावर मात करण्यात यशस्वी ठरू शकते, तर महाराष्ट्राला काय अडचणी येतात?”

केंद्र सरकारच्या नावाने खडे फोडायची राज्य सरकारला सवय लागली आहे. कोणत्याही बाबतीत विरोधी पक्षाला विश्‍वासात घेतले जात नाही. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणतात, की आम्हाला निर्णय घेता येत नाही. हे गोंधळलेले सरकार कधी एकत्र येणार अन्‌ जनतेच्या हिताचे निर्णय घेणार हा एक प्रश्‍नच आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: