कोरोना उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा-अजित पवार

कोरोनासारख्या संकटकाळात काही खासगी हॉस्पीटलकडून हलगर्जीपणा होत असल्याची बाब गंभीर आहे. कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसून, या रुग्णालयांवर कारवाई करण्यात यावी. रुग्णालयांशी समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करण्यात यावा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (ता.6) दिले आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त संदिप बिष्णोई, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिक, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबरोबरच सार्वजनिक व्यवहार सुरळीत करून अर्थचक्राला गती आणणे, हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. कोरोना प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी, नागरिकांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे, यासाठी यंत्रणांच्या समन्वयातून प्रयत्न व्हावेत. रोजगार उपलब्धतेसाठी टाळेबंदीमुळे नुकसान झालेल्या उद्योग, व्यवसायांना शासनाकडून प्रयत्न होत आहेत.

शासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत रोजगार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता जपून व निश्चित कार्यपद्धती ठरवून शाळा कशा व केव्हा सुरु करता येतील, याचा निर्णय लवकरच घेतले जातील. ससून रुग्णालयासाठी मनुष्यबळ तसेच तातडीच्या साधनसामुग्रीच्या प्रस्तावाना मंजुरी देण्यात येईल. यासाठी आवश्यक निधी तातडीने देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: