कोकणातील तिवरे-खडपोली धरण फुटले,23 जण वाहून गेल्याची भीती, अनेक गावे पाण्याखाली

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील तिवरे-खडपोली धरण फुटले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील किमान सात गावे पाण्याखाली गेली आहेत. या घटनेने परिसरात हाहाकार माजला असून किमान १९ ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे-खडपोली धरण भरून वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला.

धरणाच्या जवळ असलेल्या बेंडवाडीवर काळाने घाला घातला असून संपूर्ण बेंडवाडी पाण्याखाली गेल्याचे वृत्त आहे. सदर धरण फुटल्याचे वृत्त कळताच सरकारी यंत्रणेसह शेकडो सामाजिक कार्यकर्त्यांंनी या भागाकडे धाव घेतली आणि मदत कार्याला सुरुवात केली.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गेले चार दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. सह्याद्री खोऱ्यामध्येही पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री तिवरे धरण भरून वाहू लागले. धरणात मोठा पाणीसाठा झाला. रात्री उशिरा जॉकवेलजवळ भगदाड पडून धरण फुटल्याची दुर्घटना घडली.

एनडीआरएफचं पथक घटनास्थळी

याची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसंच पुणे आणि सिंधुदुर्गातून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

दरम्यान दादर पूल पाण्याखाली गेल्यानंतर सातही गावांचा चिपळूणशी संपर्क तुटला आहे.

=======================
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा


ग्लोबल न्युज नेटवर्क: