…म्हणून पांडुरंगाने ‘कमरेवर’ हात ठेवले

ग्लोबल न्यूज नेटवर्क – पांडुरंगाच्या मुर्तिचे अवलोकन केले असता बर्‍याच अनाकलनिय गोष्टींचे दर्शन आपणास होईल. मागील चिंतनामध्ये आपण विठ्ठलाच्या पायाखालील विटेची कथा पाहिली. आता विठ्ठलाने आपले हात कमरेवरती का ठेवले आहेत याचे थोडे चिंतन पाहु.

पुंडलिकाला भेटण्यासाठी आलेला पांडुरंग असा का उभा राहिला असेल. ? ज्ञानोबाराय म्हणतात,
हा देव कमरेवरती हात ठेवुन आपणास सांगत आहे की “अरे तुम्ही माझे स्मरण करा. मला शरण याल तर तुम्हाला संसार सागर हा कमरे इतकाच खोल राहील.

करा विठ्ठल स्मरण।
नामरुपी अनुसंधान।
जाणोनी भक्ता भवलक्षण।
जघण प्रमाण दावितो।।

तुकोबा देवाला म्हणतात, देवा तु कमरेवरती हा ठेवलेस याला कारण म्हणजे मागे भक्तांचे रक्षण करुन तुला खुप श्रम झाले आहेत.

मत्स्यरुप धरुन शंकासुराचा उध्दार करताना तुला श्रम झाले,

समुद्र मंथनाचेवेळि कुर्मरुप धरुन मंदराचळ पाठीवरती धारण केल्याने तुला श्रम झाले,

हिरण्याक्षाचा वध करुन पृथ्वी दाढेवरती धरल्याने तुला श्रम झालेत,

हिरण्यकश्यपु वध व प्रल्हादाचे अनेक संकटातुन रक्षण करुन तुला श्रम झालेत,

पाताळामध्ये बळीच्या व्दाराचे रक्षण करुन श्रम झाले,

परशुराम अवतारात एकविसवेळा पृथ्वि निःक्षत्रीय केलीस त्यामुळे श्रम झाले,

राम अवतारात रावणासह अनेक दुष्टांचा वध करुन श्रम पावला आहेस,

कृष्ण अवतारा मध्ये कंस, चाणुर, मुष्टीक, अघासुर व बकासुर यांचा वध करुन तसेत गोकुळाच्या रक्षणार्थ गोवर्धन धारण करुन तुला श्रम झाले आहेत,

अंबऋषीसाठी दहा गर्भवास सोसुन तुला श्रम झाला आहे.

आणि म्हणुनच तु विठ्ठल अवतारात आपल्या श्रमाच्या परीहारासाठी कमरेवरती हात ठेवले आहेस.

भागलासी माय बापा।
बहु श्रम केल्या खेपा।।

संतचरणरज ह.भ.प.कृष्णात कुंभार (सांगली)

ग्लोबल न्युज नेटवर्क: