केंद्र सरकारचे पॅकेज शेतीसाठी पुरसे नाही – शरद पवार

केंद्र सरकारचे पॅकेज शेतीसाठी पुरसे नाही – शरद पवार

कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केलेले पॅकेज शेती आणि शेतकरी यांच्यासाठी पुरसे नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार करीत असलेल्या सर्व सूचनांचे सर्वांनी पालन केले पाहिजे, असेही सांगितले.

ते म्हणाले, कोरोना विषाणूचा अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम दीर्घकालीन असणार आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने काही घोषणा केल्या आहेत. पण दिलेले पॅकेज शेती आणि शेतकरी यांच्यासाठी पूरक नाही. पीककर्जाची परतफेड करणे सोपे जाणार नाही. सध्या शेतात गहू तयार झाला आहे. पण तो काढायचा कसा, हा प्रश्न आहे. आंबा, संत्रे बागा फळांनी भरलेल्या आहेत. पण त्याची तोड कशी करायची, हा प्रश्न आहे. ही शेती उत्पादने बाजारात कशी आणायची हा सुद्धा प्रश्न आहे. शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेवर या सगळ्याचा विपरित परिणाम होणार आहे. त्यासाठी सरकारने काही आणखी निर्णय घेतले पाहिजेत. कर्जाच्या हफ्ते वसुलीमध्ये एकवर्षाची सूट दिली पाहिजे. जे शेतकरी कर्ज चुकवू शकणार नाहीत, त्यांना थकबाकीदार ठरवू नये, अशी मागणी त्यांनी केली.

धान्य अगदी स्वस्तात देण्याचे सरकारने सांगितले आहे. पण त्याचाही शेती अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो, याचा विचार सरकारने केला पाहिजे. सध्याचे संकट प्रत्येक व्यक्तीच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार आहे. हा काही थोड्या दिवसांचा प्रश्न नाही. पुढील एक ते दीड वर्षे याचे परिणाम दिसत राहतील, असेही त्यांनी सांगितले.

सद्यस्थितीत कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकार ज्या सूचना करते आहे. त्याचे पालन केले पाहिजे. मी स्वतः गेले काही दिवस अजिबात घरातून बाहेर पडलेलो नाही. कोणाला भेटलेलो नाही, असेही शरद पवार म्हणाले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: