केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना समूळ नष्ट करण्याचेच काम :धनंजय मुंडे

बार्शी :
मोदींनी १५ लाखाच्या नावाने जनतेला फसविले. दरवर्षी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले. भाजपाने ५ वर्षापूर्वी निवडणूकीत दिलेली आश्वासने पाळली नाहीत. ५ वर्षात शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. शेतकऱ्यांना समूळ नष्ट करण्याचे काम केंद्र व राज्यातील सरकार करत आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांना आता पराभव दिसू लागल्यानेच सरकारविरोधात महागठबंधन तयार करणाऱ्या शरद पवार यांच्याविरोधात खालच्या पातळीवर जावून टीका केली जात आहे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. देशाच्या विकासासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला साथ दया असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद, जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटे, आर्यन सोपल, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे आदी उपस्थित होते.बार्शीतील जुन्या गांधी पुतळयाजवळ ही भव्य सभा झाली.
मुंडे म्हणाले, राज्याला दुष्काळाचे चटके बसताहेत. परंतु मोदींच्या कारभाराचे बसलेले चटके दुष्काळापेक्षाही अधिक तीव्र आहेत याची जाणीव सभेला झालेली गर्दी पाहून होत आहे. मोदी हे नोटबंदी, जीएसटीचे फायदे सांगत नाहीत. मुद्रा योजना, मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, त्यांच्या काळात झालेला दहशतवादी हल्ला यावर काही बोलत नाहीत. सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून ते शहीदांच्या नावे मते मागत आहेत. यापूर्वीच्या सरकारांच्या काळातही युध्द झाली परंतु त्यांनी कधीच याचे राजकीय भांडवल करून मते मागितली नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली.
ज्यांनी शहा यांना अफजलखान म्हटले, त्यांनीच गुजराममध्ये अफजलखानाच्या शामियान्यात जावून त्यांना मुजरा केला अशी टीका त्यांनी यावेळी उध्दव ठाकरे यांच्यावर केली. राज्य सरकारच्या भ्रष्टाचारावरही त्यांनी यावेळी बोट ठेवले. राणा जगजितसिंह पाटील हे केवळ उस्मानाबादच नव्हे तर मराठवाडयाच्या विकासाचे बोलतात. त्यांना साथ दया. आ.सोपल यांनाही सहकार्य करा असे आवाहन यावेळी केले.

आ. दिलीप सोपल म्हणाले, गेल्या ५ वर्षात आपण फसवले गेलो. या काळात नुसता आश्वासनांनाच पाऊस पडला. अस्मानी संकटाबरोबरच, सुलतानी संकटांचा जनता तोंड देत आली. परंतु बार्शी तालुक्यातील जनता हिंमत हारणारी नाही. अच्छे दिनची स्वप्ने दाखवली परंतु पूर्वीचेच दिवस चांगले होते म्हणायची वेळ आता आली आहे. हे सरकार ५ वर्षात काय केले हे सांगत नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यासह त्यावर अवलंबून असलेल्या सर्वच घटकांवर याचा प्रतिकूल परिणाम झाला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले शरद पवार हेच शेतकऱ्यांचे व सर्वसामान्यांचे तारणहार आहेत. त्यामुळे महाआघाडीला साथ दया असे आवाहन त्यांनी केले.

महाआघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबध्द असल्याचे सांगत लोकसभेत जाण्याची संधी दयावी असे आवाहन केले.

यावेळी आर्यन सोपल, नागेश अक्कलकोटे, विक्रम सावळे, अब्बास शेख आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी व महाआघाडीतील पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार शहराध्यक्ष बंडू माने यांनी मानले.

admin: