औसा विधानसभा मतदारसंघात भाजप कडून अभिमन्यू पवार लढणार ?, लोकसभा निवडणुकीत दिली ताकत दाखवून

एच सुदर्शन

लातूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून उभे राहण्यासाठी पवार यांनी जनसंपर्कही वाढवलाय. आतापर्यंत विविध विकासकामांसाठी 110 कोटी रुपयांचा निधी आणून पवार यांनी मतदारसंघात जनसंपर्क तयार केला आहे.याबरोबरच लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद चे शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निबाळकर यांच्या विजयात ही पवार यांनी महत्वपूर्ण वाटा उचलला आहे.

मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अभिमन्यू पवार एक पॉवरफुल नेता अशी ओळख मुख्यमंत्र्यांनी करुन दिल्याचं बोललं जातं. त्यामुळेच औसा मतदारसंघ भाजपला सोडण्यासाठी शिवसेना तयार असल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. युतीमध्ये औसा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. 2014 च्या निवडणुकीत इथून काँग्रेसचे बसवराज पाटील यांनी विजय मिळवला होता.

औसा विधानसभा मतदारसंघ

लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेस नेते बसवराज पाटील हे सध्या या मतदारसंघाचे आमदार आहेत. 2014 ला त्यांनी शिवसेनेच्या दिनकर माने यांचा पराभव केला होता. दिनकर माने हे औसा मतदारसंघातून आतापर्यंत 1999 आणि 2004 असे दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे आहे. पण अभिमन्यू पवार यांच्यासाठी शिवसेनेने ही जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जातंय. यानंतर आता स्थानिक पातळीवर काय घडामोडी घडतात त्याकडे लक्ष लागलंय.

लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागलंय. येत्या चार महिन्यात विधानसभेसाठी निवडणूक होईल. त्यासाठी शिवसेना आणि भाजपने मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये युतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही रणनीती आखली आहे

. पण लोकसभा निवडणुकीत औसा मतदारसंघाचा पूर्ण कल युतीच्या बाजूने दिसला. औसा मतदारसंघात लोकसभेला युतीला तब्बल 53504 मतांची लीड मिळाली. शिवसेना उमेदवार ओमराजे निंबाळकर 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले. त्यात सर्वात मोठं योगदान औसा मतदारसंघाचं होतं.

admin: