ऊस पिकास पर्यायी आर्थिक उत्पन्न देणारे पीक घेण्यास कृषी पदवीधरांनी शेतकर्‍यांना प्रवृत्त करावे -जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

ऊस पिकास पर्यायी आर्थिक उत्पन्न देणारे पीक घेण्यास कृषी पदवीधरांनी शेतकर्‍यांना प्रवृत्त करावे -जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले


बार्शीत कृषी पदवीधरांचा जिल्हास्तरीय स्नेह मेळावा संपन्न


बार्शी: 


कृषी प्रधान देशात कृषी पदवीधर हा महत्त्वाचा घटक असून कृषी पदवीधराने कठीण परिस्थितीवर मात करण्याचा व एकमेकांना उपयोगी पडण्याचा चांगला गुण जोपसाला असून जिल्ह्यातील कृषी पदवीधरांनी ऊस पिकास पर्यायी पीक घेण्याबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे. तसेच पर्यावरणपूरक पारंपारिक ज्ञानाचा शेतीत वापर करणे. तसेच रसायनमुक्त अन्नधान्य व भाजीपाला पिकविणे या गोष्टींवर विशेष भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.


ते बार्शी तालुका कृषी पदवीधर विश्‍वस्त मंडळाच्यावतीने मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय कृषी पदवीधरांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे, सांबरकाठा (गुजरात) अतिरिक्त जिल्हाधिकारी नवनाथ गव्हाणे, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, मंडळाचे मार्गदर्शक महावितरणचे कार्यकारी संचालक आयपीएस अधिकारी दत्तात्रय शिंदे, विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष सयाजीराव गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक संतोष पाटील आदी उपस्थित होते. 


यावेळी 2019 मध्ये केंद्रीय व राज्य सेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षेद्वारे विविध पदांवर निवड झालेल्या जिल्ह्यातील 67 कृषी पदवीधरांचा सन्मान चिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वॉटर कप स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या सुर्डी व तालुक्यातील प्रथम आलेल्या अरणगांव, चुंब व खडकोणी या गावांच्या सरपंचांचा व विशेष योगदान देणार्‍या कृषी सहाय्यकांचाही सन्मान करण्यात आला. 


नवनाथ गव्हाणे यांनी कमी पाण्यात योेग्य असा पीक बदल करणे, शेतीबरोबरच जोड उद्योग व्यवसाय असणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांनी अमोल डेअरीचे उदाहरण दिले. दीपक तावडे यांनी तुमचा शैक्षणिक संघर्ष संपला असला तरी हे पद जनसेवेसाठी असून हीच तुमच्या करियरची खरी सुरुवात असल्याचे सांगितले. 


दिलीप झेंडे म्हणाले की, कृषी पदवीधरांनी गावातील राजकारणात न पडता समाजकारण व लोकसहभाग मिळवत शेतकर्‍यांची सेवा करावी व तसेच गट शेती व बाजारपेठ मिळवत आर्थिकदृष्ट्या किफायतशीर शेतीबाबत शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, असे सांगितले. प्रास्ताविक अध्यक्ष सयाजीराव गायकवाड यांनी   सन 1995 च्या दिवाळीमध्ये एकत्र येत बार्शीच्या कृषी पदवीधरांनी सुरु केलेल्या या मंडळाने शेतकर्‍यांसाठी व ग्राम विकासासाठी सेवेची गरुड भरारी घेवून आपला ठसा उमटविला आहे. राज्यातील विविध भागात प्रशासनात उच्च पदावर असलेल्या व आपल्या तालुक्याच्या मातीशी प्रेमाचे नातेसंबंध जपत सेवेचा वसा मंडळाचे सदस्य राबवत असल्याचे ते म्हणाले. मंडळाचे संस्थापक मार्गदर्शक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.

संतोष पाटील यांचा विशेष गौरव


रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मुंबई विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था संतोष पाटील यांचा  कृषीरत्न पुरस्काराने सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. तसेच पाटील यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील 10 गांवे दत्तक घेवून या गावात लोकसहभागातून जलसंधारण व ग्राम विकासाची कामे करावीत, असे सुचविले.  

ग्लोबल न्युज नेटवर्क: