उपमुख्यमंत्री झालेल्या अजितदादा बद्दल काय म्हणाले आमदार रोहित पवार; वाचा सविस्तर-

ग्लोबल न्यूज नेटवर्क: राज्यात घडलेल्या राजकीय भूकंपा नंतर राज्यात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. राज्यातील मातब्बर राजकीय घराणे असलेल्या पवार परिवारात राजकीय दुफळी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पवार घराण्यातील पुढच्या पिढीचे वारसदार आमदार रोहित पवार2यांनी फेसबुक पोस्टद्वारे अजितदादानी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं.अशी अपेक्षा व्यक्त करत लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं असे म्हटले आहे.

फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते.

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही.

आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,

पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब” होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं.

लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: