उजनी व वीरमधून 1 लाख 32 क्युसेकचा विसर्ग, नदीकाठी प्रशासन सतर्क

पंढरपूर, – भीमा व नीरा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे धरणांमधील आवक वाढत असल्याने उजनीतून मधून रविवारी सायंकाळी एक लाख तर वीरमधून 32 हजार क्युसेक विसर्ग सोडला जात होता. यामुळे पुन्हा जिल्ह्यात भीमा सव्वा लाख क्युसेकने वाहणार आहे. यामुळे भीमा काठी प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे.

येथील पूरस्थिती ओसरून दोन तीन दिवसच झाले आहेत. आज संगम येथे भीमा नदी सायंकाळी 83 हजार तर पंढरीत 52 हजार क्युसेकने वाहत होती. उजनी धरण 105 टक्के भरले असून दौंडजवळून उजनी जलाशयात 75 हजार क्युसेक पाणी मिसळत आहे.

यात आता पाणी साठविण्यासाठी जास्त जागा नसल्याने रविवारी सायंकाळी नदीत सोडण्यात येणार्‍या विसर्गात वाढ करण्यात आली व तो 1 लाख क्युसेक इतका करण्यात आला आहे. तत्पूर्वी 80 हजाराचा विसर्ग सोडला जात होता. दरम्यान नीरा खोर्‍यात ही पावसाचा प्रमाण कमी झाले असले तरी हजेरी कायम असल्याने वीरमध्ये आवक होत आहे.

परिणामी नीरा नदीत 32 हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. उजनीचा विसर्ग वाढल्याने व वीरचे पाणी पाहता भीमाकाठी प्रशासनाच्या वतीने सतर्कता बाळगली जात आहे.

पंढरपूरमधील व्यासनारायण झोपडपट्टी व अन्य वसाहतीत पुन्हा पाणी येण्याची शक्यता आहे. याच बरोबर गोपाळपूरचा लहान पूल पाण्याखाली जावू शकतो. प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात असून उजनी व वीरच्या पाणी विसर्गावर तसेच नदी पाणी पातळीवर प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

ग्लोबल न्युज नेटवर्क: