नवी दिल्ली । आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर 28 तासांनंतर ताब्यात घेण्यात आलं आहे. सीबीआयच्या पथकाने चिदंबरम यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतलं. चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद ठेवण्यात आल्याने त्यावरून उड्या मारून सीबीआय टीम आत गेली व अटकेची कारवाई करण्यात आली. हा ‘हायव्होल्टेज ड्रामा’ सुरू असताना चिदंबरम यांच्या जोरबागमधील घराबाहेर मोठी गर्दी जमली होती. सीबीआयने पी चिदंबरम यांना दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन ताब्यात घेतलं आहे.
पी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. मात्र पी चिदंबरम बेपत्ता होते. सीबीआयच्या टीमसोबतच ईडीची टीमही चिदंबरम यांच्या घरी दाखल झाली होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे.
सीबीआयची टीम पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चिदंबरम यांच्या घराबाहेर जमा झाले. नरेंद्र मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांना अडकविण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. सीबीआयचे मुख्य संचालकही पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले.
कार्यकर्त्यानी मोदी विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यादरम्यान पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.