आम्ही दिले होते त्याप्रमाणे फळबागा वाचविण्यासाठी 35 हजार अनुदान द्यावे-शरद पवार

मुंबई । दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारवर निशाणा साधत पवार म्हणाले, पिण्याचे पाणी, पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या, रोजगार आणि एखादं पीक गेलं की त्याचा नुकसान भरपाई ही काळजी सरकराने घ्यायला हवी. पण एखादं पीक जाणं आणि फळबाग जाणं यात मोठा फरक आहे. इतर पिके ही साधारण सहा महिन्यांची असतात. परंतु फळबागा मात्र फळधारणेपूर्वी 5 वर्षे जीवापाड जपावी लागतात. फळबागा वाचवण्यासाठी आमच्या सरकारच्या काळात आम्ही 35 हजार रुपये पाणी घालण्यासाठी अनुदान दिले होते, तसेच अनुदान या सरकारने द्यावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, नवाब मलिक व अनेक नेते उपस्थित होते. तत्पूर्वी दुपारी दीडच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय महाडिक, आनंद परांजपे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुप्रिया सुळे, रामराजे नाईक निंबाळकर, जितेंद्र आव्हाड, पार्थ पवार यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

पवार पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीत आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांकडे जाईल आणि सध्याची दुष्काळाची परिस्थिती मुख्यमंत्र्यांना सांगेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. जनावरे वाचवण्यासाठी या सरकारने लहान आणि मोठी जनावरे, अशी विभागणी केली आहे. त्यात एका शेतकऱ्याची 5 जनावरे एवढीच घेतली जात आहेत. बाकीच्या जनावरांचे शेतकऱ्यांनी काय करावे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून सर्व प्रकारची वसुली थांबवली गेली पाहिजे. कर्जमाफी आणि कर्जाचे पुर्नगठन हे दोन्ही प्रश्न सोडवले पाहिजेत, असे पवार म्हणाले.

admin: