आम्हाला सत्ता हवी आहे,पण सत्तेची हाव नाही :उद्धव ठाकरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी बीकेसी येथे मेट्रो भवन आणि मेट्रोच्या 3 मेट्रो मार्गांचे भूमिपूजन करण्यात आले. या मेट्रो प्रकल्पांच्या भूमिपूजन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 वाचा त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे- 

अनेक चांगल्या गोष्टी आम्ही करतो आहोत, आणि त्याला नरेंद्र भाई आपला आशीर्वाद आहे, आपला पाठिंबा आहे तो असाच मिळत राहावा ही एक तमाम आमच्या राज्याच्या वतीने आपल्याला विनंती करतो.

परवा एक चांगला कार्यक्रम झाला तो म्हणजे संपूर्ण देशात आपला महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलं की ज्याने एसटीच्या माध्यमातून आंतर शहर इलेक्ट्रिक बस ही देशामध्ये पहिल्या प्रथम आणली.

आम्हाला सत्ता हवी आहे, जरूर हवी आहे. सत्तेची हाव नाही, पण सत्ता राज्याचा विकास करण्यासाठी पाहिजे.

हे सरकार आता पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहे, महाराष्ट्रात येणार तर युतीचे सरकारच येणार.

लोकसंख्या वाढत आहे पण त्या वाढत्या लोकसंख्येला सुविधा देणे, त्या सुविधा सुद्धा तुम्ही देत आहात म्हणून मला मुंबईकरांच्या वतीने त्याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत.

इस्रोच्या शास्त्रज्ञांचा सगळ्यांना अभिमान आहे. आपला देश कुठेही कमी नाही, कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही. आपल्या देशाची कुवत, आपल्या देशाची ताकद, आपल्या देशाची क्षमता आहे.

मला खात्री आहे, नजीकच्या काळामध्ये अयोध्येमध्ये आपलं राम मंदिर सुद्धा आपण उभं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही.

आपण आता चंद्राला सुद्धा गवसणी घातली आहे, हे केवढं मोठं विकासाचं आणि धाडसाचं स्वप्न पूर्ण केलेलं आहे.

मोदी जी मला अभिमान आहे की जे स्वप्न तमाम हिंदुस्थानने आपल्या उराशी बाळगले होते, काश्मीर हा आपला अविभाज्य घटक होता आहे आणि राहणार, हे तुम्ही शब्दात नाही प्रत्यक्षात आणून दाखवले आहे.

आज मला अभिमान आहे, इथेच पलीकडे आपली प्रचाराची विराट सभा झाली होती. आणि त्या सभेत आपण ठणकावून सांगितले होते की आमचं सरकार येणार म्हणजे येणारच आणि ते आलंच.

ग्लोबल न्युज नेटवर्क: