आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे

मुंबई : सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या लष्करातील जवानांच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन विधान परिषदेत आज मागे घेण्यात आले. सभापती आणि विविध पक्षांच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. परिचारक यांचे निलंबन मागे घेण्यास विरोध करणारी शिवसेना यावेळेस मात्र शांत राहिली.या निर्णयाला काँग्रेसने मात्र कडाडून विरोध केला.

जवानांच्या पत्नीविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले होते. तसेच विधानभवन परिसरात प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली होती. विधिमंडळ अधिवेशन काळात परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी सत्ताधारी पक्षांनी अनेकदा केली होती. मात्र, प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याने विरोधकांनी सातत्याने विरोध केला होता. शिवसेना सत्तेत असतानाही परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह शिवसेनेच्या आमदारांनी निलंबनास विरोध केला होता.

सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत परिचारक याना विधानभवनात प्रवेश करायला तसेच सभागृहाच्या कामकाजात सहभागी होण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केला.
आज गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा करून हा निर्णय घेतल्याचे सभापतींनी सांगितले .यावेळी काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी या निर्णयाला विरोध केला. मात्र, शिवसेनेचे आमदार गप्प बसून होते. परिचारक यांनी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांना 9 मार्च 2017 ला दीड वर्षांसाठी निलंबित केले होते.

धिरज करळे: