आप्पासाहेब पवार,प्रवरा कारखाना, आळंदी वारी आणि रोहित पवार,वाचा सविस्तर-

ग्लोबल न्यूज नेटवर्क: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे बंधू शेतीतज्ञ आप्पासाहेब पवार यांनी साखर कारखानदारीत व शेतीत नवनवे प्रयोग करून यशस्वी पाऊलवाट तयार करून पुढील पिढीसाठी ठेवल्या आहेत.पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुढच्या पिढीतील कै बाळासाहेब विखे पाटील व राधाकृष्ण विखे पाटील पवारांच्या पिढीतील शरद पवार अजित पवार यांच्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय वादाच्या व मतभेदांच्या पार्श्वभूमीवर आप्पासाहेब पवारांचे नातू रोहित पवार यांनी आळंदी वारीच्या निमित्ताने आप्पासाहेब पवारांच्या कार्याला फेसबुक पोस्ट च्या माध्यमातून उजाळा दिला आहे.

हीच ती पोस्ट जशी आहे तशी

गर्दीतून वाट काढत एक वयोवृद्ध शेतकरी समोर आले आणि मला म्हणाले तूम्ही अप्पासाहेबांचे नातू ना. खूप ऐकलय तूमच्याबद्दल. माऊलींच्या मंदिरातच भेटायचा योग आला. इतक्या गर्दीत देखील ते अप्पासाहेबांबद्दल भरभरून बोलले. ते गृहस्थ अहमदनगर जिल्ह्यातले. अप्पासाहेब जेव्हा मॅनेंजिंग डायरेक्टर म्हणून प्रवरानगरच्या सहकारी कारखान्यामध्ये होते तेव्हा त्यांची ओळख झाली होती. त्याच ओळखीवर त्यांनी त्यांच्या नातवाप्रमाणे मला जवळ घेतले. मायेचा हात खांद्यावर टाकला.

आजही अनेक ठिकाणी अप्पासाहेबांचा जवळून संपर्क आलेल्या व्यक्ती मला भेटत असतात. विशेषत: नगर जिल्ह्यामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्यासोबत त्यांनी सहकारी साखर कारखान्यामध्ये केलेल्या कामांचा उल्लेख निघत असतो.

अर्थतज्ञ धनंजय गाडगीळ व पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या प्रयत्नातून प्रवरानगर येथे पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला. याच कारखान्यामध्ये अप्पासाहेब पवार मुलाखत देवून ज्युनिअर शेती अधिकारी म्हणून नोकरीस लागले.

माणसाचे विचार चांगले असतील आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर माणूस कोणत्याही संकटावर मात करु शकतो असे त्यांचे विचार. याच विचारांच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर त्यांनी प्रवरा कारखान्यात सुरवातीच्या काळात काम केले. पुढे सेक्रेटरी पदाच्या कर्तव्यातून अवघ्या दहा महिन्यात सणसरचा सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला. अकलुजच्या सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत देखील त्यांचा मोलाचा वाटा होता.

त्यानंतरच्या काळात म्हणजे १९६७ च्या दरम्यान साहेब निवडणुकीस उभा राहिले. अप्पासाहेबांनी नोकरी सोडली आणि आदरणीय साहेबांच्या प्रचारासाठी बारामतीत आले. साहेब आमदार झाल्यानंतरच्या काळात प्रवरा सहकारी साखर कारखाना अडचणीत आला होता. त्या अडचणींवर मात करण्यासाठी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी अप्पासाहेबांना विश्वासाने मॅनेंजिंग डायरेक्टर म्हणून बोलावले. अप्पासाहेबांनी साखर कारखाना पुन्हा सुस्थितीत आणला.

याच कारखान्यामार्फत अप्पासाहेब तीन महिन्यांसाठी इस्त्रायलच्या अभ्यासदौऱ्यासाठी गेले होते. ठिबक सिंचन, आधुनिक शेती, संकरित गाई यांची ओळख याच दौऱ्यात झाली. परत आल्यानंतर कारखान्यामार्फत वेगवेगळे प्रयोग राबवण्यास सुरवात झाली. सभासद शेतकऱ्यांसाठी त्यांनी अभिनव प्रयोग सुरू केले व त्यातूनच ऊस उत्पादन, साखर कारखाने याच्याही पुढे जात शेती, शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटूंबाच्या विकासाचा अविरत प्रवास सुरू झाला.

शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी असे प्रयत्न केले की ज्याची आठवण आजही भेटणारे व्यक्ती सांगत असतात. असेच ते आजोबा आळंदीच्या मंदिरात माझ्या समोर आले आणि अप्पासाहेबांच्या आठवणी बोलून दाखवू लागले. ते म्हणाले शेतीतून चार पैसै मिळू शकतात हे अप्पासाहेबांमुळे आम्हाला कळालं. अशी माणसे भेटली की जून्या आठवणी समजतात पण त्याचसोबत आपली जबाबदारी किती मोठ्ठी आहे याची जाणिव होते.

…………………

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा ग्लोबल न्यूज मराठीचे फेसबुक पेज लाईक करा.
व खालील शेअर बटनावर ↘↘↘ क्लिक करुन आत्ताच ही बातमी तुमच्या फेसबुकवर शेअर करा.

ग्लोबल न्युज नेटवर्क: