आता निवडणुका झाल्या तर,राज्यात युतीला 226 जागा मिळण्याची शक्यता; महाआघाडीला फक्त 56


ग्लोबल न्यूज नेटवर्क : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत रालोआने ऐतिहासिक विजय मिळविला. देशभरात रालोआने 353 जागांवर, तर एकट्या भाजपने 303 जागांवर विजय मिळविला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे. जनतेचा कल असाच राहिला, तर विधानसभेचा निकालही भाजपा-शिवसेना युतीसाठी अनुकूल असू शकतो. युतीला 288 पैकी किमान 226 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील लोकसभेच्या सर्व सहा मतदारसंघात युतीच्या उमेदवारांनी मोठा विजय मिळविला आहे. या सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये विधानसभेचे 36 मतदारसंघ असून, यातील 31 मतदारसंघात युतीला बहुमत मिळाले आहे, तर 5 मतदारसंघात काँग्रेसने आघाडी घेतली. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईत युतीच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

राज्यातील लोकसभेच्या 48 जागांचा विचार केला, तर भाजपा-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या. त्यात भाजपा 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5 व काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने प्रत्येकी एक जागा जिंकली.

या लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास भाजपा-सेना युतीला 288 सदस्यीय राज्य विधानसभेत किमान 226 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 56 जागा मिळू शकतात.

विभागनिहाय पडताळणी केल्यास मुंबईतील 36 पैकी युतीला 31, आघाडीला 3 आणि एमआयएमला एक जागा मिळू शकते. कोकणातील 36 पैकी युतीला 27, आघाडीला 8 आणि महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाला 1 जागा, मराठवाड्यातील 48 पैकी युतीला 39, आघाडीला 6 आणि एक जागा अपक्षच्या खात्यात जाऊ शकते. विदर्भातील 60 जागांपैकी युतीला 49, आघाडीला 11 जागा, उत्तर महाराष्ट्रातील 36 पैकी युतीला 31 आणि आघाडीला 5 जागा, पश्चिम महाराष्ट्रातील 72 पैकी युतीला 49 आणि आघाडीला 23 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

admin: