अरविंद सावंत यांचा राजीनामा, अखेर शिवसेना एनडीएमधून बाहेर

नवी दिल्ली । राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून अखेर शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडली आहे. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे राजीनामा सोपविला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाशिवआघाडी जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे.

रविवारी भाजपाने सत्तास्थापन करण्यात असमर्थता दाखविली आहे. त्यामुळे राज्यपालांनी दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला निमंत्रण दिलं आहे. मुख्यमंत्रिपदावर ठाम असणारी शिवसेना एनडीएतून बाहेर पडत नाही तोवर शिवसेनेला पाठिंबा देण्याचा विचार होऊ शकत नाही असं आघाडीने सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

राज्यातील राजकीय चित्र वेगाने बदलताना दिसत आहे. रविवारी भाजपने राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्यास असमर्थता दाखवली. त्यानंतर राज्यपालांनीही शिवसेनेला सोमवारी सायंकाळी ७.३० पर्यंत सरकार स्थापन करण्यासाठी वेळ दिला आहे. शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही हालचाली तीव्र झाल्या आहेत. भाजपनेही बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण देणारा ठरणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: