पुणे: महाविकास आघाडी असल्याने मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत शिवसेना, कॉग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुखांनी त्याबाबत निर्णय घेतला असून दि. 30 डिसेंबर रोजी शपथविधी ठरलेला आहे. कोण शपथ घेणार हे ठरलेले नाही. राष्ट्रवादीला गृहखाते मिळणार का नाही? हे माहित नाही पण त्यामध्ये आणखी एखादे महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनानंतर ते बोलत होते. जिल्हा परिषद निवडणूकीबाबत पवार पुढे म्हणाले, जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी राज्यामध्ये ज्यापध्द्तीने महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविला गेला आहे. त्याचा विचार करता ज्याठिकाणी पक्षाचे स्पष्ट बहुमत असेल तेथे हा प्रश्न येणार नाही. मात्र तरी ही त्या-त्या जिल्ह्यातील संबंधित पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन चर्चा करावी. त्यातून निर्णय न झाल्यास राज्यातील पक्षश्रेष्ठींकडे विषय मांडावा.
दरम्यान, यापुर्वीच्या सरकारने जाहिर केलेले प्रकल्प मार्गी लागणार नाहीत, अशी चर्चा केली जात आहे. याबाबत बोलताना पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी याबाबत अधिवेशनामध्ये भुमिका स्पष्ट केलेली आहे. आधीच्या सरकारच्या 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत मंजुरी झालेले प्रकल्पांवर पुनर्विचार करुन अधिक चांगल्या प्रकारे राबविले जातील. कोणताही निधी अडविलेला नाही आणि कोणत्याही विकासकामांना खीळ बसू देणार नाही.
कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर सीसीटीव्ही बसवतील या वक्तव्याबाबत बोलताना पवार म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एका पक्षाचे प्रांताध्यक्ष आहेत. वास्तविक त्यांचा 25 वर्षे मित्र असलेला शिवसेना पक्ष बाजुला गेल्याने त्यांना वेदना होत आहेत. देशपातळीवर असलेल्या पक्षाच्या प्रांताध्यक्षाने वेगळ्या पध्दतीने बोलणे उचित नाही. कोणती ही खाती कोणाकडे असली तरी राज्याचा प्रमुख म्हणून सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांनाच असतो. कावळ्याच्या शापाने गुर मरत नाहीत… चोराच्या मनात चांदण… आणि जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशा म्हणी सांगत चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस
वसंतदादा शुगर इन्स्टिटयुटच्या कार्यक्रमामध्ये पवार साहेबांच्या शेजारी माजी नेमप्लेट होती. परंतु, मी साधा आमदार आहे. त्यामुळे पवार साहेबांशेजारी पक्षाचे प्रांताध्यक्ष म्हणून जयंत पाटील तर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात असणे गरजेचे आहे. त्यानुसार मी त्या दोन नेमप्लेट नंतर माझी खुर्ची ठेवली होती. माझ्या बुध्दीला पटणार नसल्याने मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे. हर्षवर्धन पाटील आणि माझा बांध शेजारी नाही. वेगवेगळ्या राजकीय पक्षात काम करीत असलो तरी पक्षाच्या भूमिकेला काही मर्यादा असतात.