एच डी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखाली असलेले कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले आहे. विधानसभेत प्रत्यक्षात आमदारांची मोजणी केल्यानंतर ९९ विरुद्ध १०५ अशा अल्पमतात कर्नाटक सराकर कोसळल्याचे स्पष्ट झाले.
तत्पूर्वी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकार अडचणीत सापडले होते. सभापतींनी विश्वादर्शक ठरावाच्या मतदानासाठी सायंकाळी ६ वाजण्याची वेळ दिली होती. मतदानापूर्वी कुमारस्वामी यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी दुखालोय असे सांगत पदत्याग करत असल्याचे सांगितले.
कुमारस्वामी म्हणाले की, २००४ मध्ये आताप्रमाणेच कोणाकडेही बहुमत नव्हते. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या गोष्टींचा प्रसार करत आहेत. कार्यकर्त्यांना असे करण्यापासून रोखावे, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.
ते पुढे म्हणाले, मी ताज वेस्ट एन्डमध्ये वास्तव्यास असून जनतेची लुट करत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले जात आहे. विधानसभेच्या निकालावेळी मी या ठिकाणीच वास्तव्यास होता. काँग्रेसने मला मुख्यमंत्री पदासाठी विचारले. त्यामुळे ती रुम माझ्यासाठी लकी असल्याचे मानत मी तिथेच राहणे पसंत केले, असे कुमारस्वामी यावेळी म्हणाले. मी सरकार वाचवण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले. सभागृहातील बऱ्याच नेत्यांची भावना लक्षात घेऊन मी प्रामाणिक प्रयत्न केले.