तुम्ही स्वबळ वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार, हे चालणार नाही – उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनी शिस्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी विरोधकांचा तसेच नाव न घेता स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पाटोळे यांचा सुद्धा समाचार घेतला होता. ”काही जण स्वबळाचा नारा देत आहेत. तसा आपणही देऊ, तो आमचा हक्क आहे, अधिकार आहे. मात्र स्वबळ म्हणजे नेमके काय हे आधी समजून घेतले पाहिजे.

कोविडनंतरची स्थिती भीषण आहे. आपले काय होणार ही अस्वस्थता प्रत्येकाच्या मनात आहे. रोजगार गेला आहे, जवळची माणसे कोरोनाने हिरावून नेली आहेत. सर्वत्र विदारक चित्र आहे. जनतेची ही चिंता लक्षात न घेता कुणी स्वबळाचा नारा दिला तर लोक जोडय़ानं हाणतील. तुझं बळ तू वाढवणार आणि आम्हाला भिकेला लावणार हे खपवून घेणार नाही असे लोक म्हणतील. अशा स्थितीत एक अस्वस्थता उफाळून येईल हे लक्षात ठेवा”, असा इशाराच आज शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी साद सुरुवातीलाच घालताना उद्धव ठाकरे म्हणाले, बऱयाच दिवसांनी माझ्या मनोगताची सुरुवात मी अशी करतो आहे. आता काही वेळासाठी मुख्यमंत्रीपदाची वस्त्र बाजूला ठेवून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. गेल्या ५५ वर्षांतील शिवसेनेच्या वाटचालीचे श्रेय कोणा एकटय़ाचे नाही, तर आपल्या कामाने, कष्टाने आणि घामाने ज्यांनी हा पक्ष वाढवला त्यांचे आहे, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना अभिवादन केले आणि शिवसेना कुटुंबातील सर्व सदस्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.

शिवसेनाप्रमुखांचा वाढदिवस, शिवसेनेचा वर्धापन दिन आणि ‘मार्मिक’चा वर्धापन दिन हे तीन दिवस शिवसैनिकांसाठी ‘सण’ आहेत असे प्रमोद नवलकर म्हणायचे. ते खरेच आहे. मात्र गेल्या दीड वर्षात या नव्या ऑनलाइन माध्यमाद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधावा लागत आहे, असे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा पाच दशकांतील वाटचालीचा लेखाजोखा तर मांडलाच, पण शिवसेनेवर, पक्षाच्या हिंदुत्ववादावर नाहक टीका करणाऱयांचाही यथेच्छ समाचार घेतला.

Team Global News Marathi: