यशवंतराव आणि वसंतदादांनी महाराष्ट्राच्या वाटचालीचे अधिष्ठान निर्माण केले – ज्येष्ठ पत्रकार राजा माने

 

यशवंतराव आणि वसंतदादांनी महाराष्ट्राच्या वाटचालीचे अधिष्ठान निर्माण केले -ज्येष्ठ पत्रकार राजा माने

नवी दिल्ली , १० : यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या मुख्यमंत्री द्वयींनी महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टीकोण निर्माण करण्यासाठी, प्रगतीची दिशा ठरविण्यासाठी व राज्याच्या विविध क्षेत्रांना पुढे घेवून जाण्यासाठी महाराष्ट्राच्या वाटचालीचे अधिष्ठान तयार केले, असे मत ज्येष्ठ पत्रकार व माध्यम तज्ज्ञ राजा माने यांनी आज मांडले.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे 23 वे पुष्प गुंफताना “ महराष्ट्राचे शिल्पकार : यशवंतराव-वसंतदादा ” या विषयावर श्री माने बोलत होते.

नव महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून नव महाराष्ट्राचे स्वप्न पाहतांना भौतिक विकासाबरोबरच सांस्कृतिक, साहित्यिक, सामाजिक, पुरोगामी दृष्टीकोणातून महाराष्ट्राची वाटचाल करण्याची मांडणी व समाजकारण केले होते. वसंतदादा पाटील यांनी सहकारी कारखानदारीच्या सहकार्याने राज्याच्या ग्रामीण भागाचा विकास करण्याचा मोलाचा दृष्टीकोण दिला. शिक्षण क्षेत्राला त्यांनी अमुलाग्र दिशा देण्याचे कार्य करतानाच पाटबंधारे क्षेत्राला कार्यक्षम करण्याची किमया केली. या उभय नेत्यांनी आपल्या कर्तुत्वातून महाराष्ट्राच्या वाटचालीला महत्वाचे अधिष्ठान प्राप्त करून दिले असे श्री माने यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 14 दिवसांचा लॉकडाऊन करण्याची टास्क फोर्स सदस्यांची शिफारस

महाराष्ट्राचे असंख्य शिल्पकार आहेत. वेगवेगळे विचार प्रवाह, चळवळी व वेगवेगळया क्षेत्रात कार्य करणारी मंडळी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा आजचा चेहरा आहे. पण, राज्याच्या वाटचालीला निश्चित अधिष्ठान प्राप्त करून देण्यात यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. 1946 मध्ये बेळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनात सर्वप्रथम ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा विचार मांडण्यात आला. पुढे त्यासाठी मोठा लढा उभारला गेला व 105 हुतात्म्यांनी यासाठी बलिदान दिले व यातून 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले व ते नव महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले गेले असे श्री. माने म्हणाले.

 

यशवंतरावांनी उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न पाहिले त्या प्रकारची मांडणी केली व स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कसोसीने कार्य केले. 1962 मध्ये चीन ने भारतावर आक्रमण केले तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतले, तेव्हा ‘हिमालयाच्या मदतीला सहयाद्री धावून गेला’ असे अभिमानास्पद उद्गार महाराष्ट्रात सर्वांच्या मुखी आले. चीन ने त्या युध्दात माघार घेतली आणि देशाच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण हे नाव स्थिर झाले.राष्ट्रीय राजकारणात गेल्यावरही यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत योगदान दिल्याचे श्री. माने यांनी सांगितले.

 

1942 च्या स्वातंत्र्य लढयात सक्रीय भाग घेत सांगलीचा जेल फोडून इंग्रजांच्या तावडीतून सुटले लढवय्यावृत्तीचे वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठीही अशीच लढवय्यी वृत्ती दाखवल्याचे श्री.माने म्हणाले. महाराष्ट्रात ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही चळवळ वसंतदादांमुळे पुढे आली. सहकार व सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीणभागाच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ‘भाग विकास निधी’ आणि ‘शिक्षण निधी’ ही संकल्पना त्यांनी प्रभावीपणे राबविली. ज्या भागात सहकारी साखर कारखाना आहे त्या भागासाठी कारखान्यांनी ‘भाग विकास निधी’ दिला पाहिजे तसेच त्या भागातील शिक्षण विकासासाठी ‘शिक्षण निधी’ दयायला त्यांनी भाग पाडले.

1980 च्या दशकात शिक्षण क्षेत्राबाबत वसंतदादा पाटील यांनी आखलेल्या धोरणामुळे राज्यात शिक्षणाचे विस्तारीकरण व शिक्षणाची व्यापक उपलब्धता निर्माण झाली. त्यांनी ‘विनाअनुदानीत शिक्षण संस्था’ ही क्रांतीकारी सुरुवात केली. यामुळेच आज राज्यात अभिमत विद्यापीठांचे जाळे निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यांनी पाटबंधारे विभागाला कार्यक्षम केले. जायकवाडी हे आशिया खंडातील पहिले मातीचे धरण उभारण्याच्या कामाच्या खर्चात त्याकाळात 2 कोटी 80 लाख रूपयांची बचत केल्याचा संदर्भ श्री माने यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्राच्या शेतीला उज्ज्वल चेहरा देणारे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे व धवल क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक शेती क्षेत्रात केलेले कार्य तसेच राज्याच्या जलसिंचन क्षेत्राला क्रांतीकारी दिशा देणारे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कार्यावरही श्री माने यांनी प्रकाश टाकला.

यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या वाटचालीला दिलेल्या अधिष्ठानुसार राज्याची उत्तरोत्तर झालेली प्रगती अभिमानास्पद आहे. महाराष्ट्राने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, उपपंतप्रधान दिले तसेच चित्रपट,क्रीडा,विज्ञान आदी क्षेत्रातही राज्याने देशाला रत्न दिल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखीत केले. गेल्या 60 वर्षात पुरोगामीत्वाची, वैचारीक तर्काची,विधायक दृष्टीकोणाची भूमिका आचरणात आणत महाराष्ट्राने प्रगतीशील वाटचाल केली असून देशाच्या विकासाला गती देण्याचे महत्वाचे कार्य केल्याचेही श्री .माने यांनी सांगितले.

 

०००००

ग्लोबल न्युज नेटवर्क: