…. यामुळेच राज्यातील शिंदे सरकार पडणार, संजय राऊतांचा सामनातून हल्लाबोल

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आपल्या पक्षातील नेत्यांसह करण्यात आलेल्या गुवाहाटी दौऱ्यावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत अग्रलेखात म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेची सर्व संकटे दूर व्हावीत, आनंद, सुख-समृद्धी मिळावी असा नवस कामाख्या देवीच्या चरणी केल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात, पण महाराष्ट्रावरील खरे संकट मुख्यमंत्री व त्यांचा गद्दार मिंधे गट हेच आहे.तेव्हा हे संकट देवी लवकरात लवकर दूर करेल व महाराष्ट्राला सुखाचे, आनंदाचे, स्वाभिमानाचे दिवस आणेल याविषयी आमच्या मनात शंका नाही. देवी एकदम कडक आहे याची प्रचीती येईलच, असा टोला राऊत यांनी शिंदे सरकारला लगावला आहे.

कामाख्या मंदिरास ‘तंत्र-मांत्रिकां’चे प्रमुख सिद्धपीठ मानले जाते. जगभरातले तांत्रिक एका विशिष्ट दिवशी येथे जमतात. त्यामुळे आई कामाख्यास तांत्रिक-मांत्रिकांची देवी म्हणून ओळखले जात असले तरी हा एक महान शक्ती साधनेचा गड आहे व लोक येथे एका श्रद्धेने येत असतात. अशी आख्यायिका आहे की, येथे ‘बळी’ प्रथा आहे व लहान रेड्यांचा बळी दिला जातो. (खरे खोटे 40 खोके आमदारांनाच माहीत) महाराष्ट्रात अनेक स्थानांवर कोंबडी, बकऱयांचा बळी दिला जातो व त्या अंधश्रद्धेस सगळ्यांचा विरोध आहे, पण शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रात सत्ता यावी म्हणून फुटीर गटाने असे बळी गुवाहाटीस जाऊन दिले हे खरे असेल तर महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेस ते शोभणारे नाही, असे संजय राऊत म्हणाले.

आसामात महाराष्ट्र भवन व महाराष्ट्रात आसाम भवन निर्माण करण्याबाबत ते बोलले. एकंदरीत पडद्यामागच्या हालचाली पाहता मुख्यमंत्री लवकरच माजी होण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. त्यानंतर त्यांना त्यांच्या शिल्लक गटासह आसामातच राहावे लागेल. त्याची सोय ते जाता जाता करीत असावेत. त्यामुळे कामाख्या देवीच्या नावाने भलते-सलते उद्योग करू नका. खोके सरकार व आता रेड्याचे सरकार म्हणून आपण मशहूर झाला आहात हा देवीचाच कोप म्हणायला हवा, असे म्हणत राऊत यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले.

Team Global News Marathi: