…यामुळे अंधेरीत आमचाच उमेदवार मताधिक्याने निवडून येणार – सुधीर मुनगंटीवार

 

मुंबईतील अंधेरीची निवडणूक आता रंगात आली आहे. या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युती, असा सामना रंगणार आहे. २०१९मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावून स्व. लटके यांनी निवडणूक जिंकली होती. पण आता त्याठिकाणी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे फोटो राहणार आहेत. त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीचा निकाल काय लागेल, याचा अंदाज येऊ शकतो, असे भाजप नेते आणि राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री मुनगंटीवार म्हणाले, अंधेरीची पोटनिवडणूक भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना युती निश्‍चितपणे जिंकेल, यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचे कारण नाही. कारण महाविकास आघाडीचा अडीच वर्षांचा राज्यकारभार जनतेने सोसला आहे. २०१९ मध्ये २४ ऑक्टोबरला निवडणुकीचे निकाल कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला झटका देणारे होते. १६१ विधानसभा तेव्हाही आम्ही जिंकल्या होत्या. त्यामध्ये अंधेरीच्या जागेचाही समावेश होता. आताही ही जागा आम्ही निश्‍चितपणे जिंकू, असेही ते म्हणाले.

२०१९च्या निवडणुकीत अंधेरीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावूनच स्व. लटके विजयी झाले होते. आता तिथे सोनिया गांधी आणि शरद पवारांचा फोटो लागणार आहे. मागच्या निवडणुकीत हेच फोटो बघून अंधेरी विधानसभा मतदारसंघातील लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला झटका दिला होता. जनतेने त्यांना स्पष्टपणे नाकारले होते. आणि आता महाविकास आघाडीमध्ये हे फोटो लागतील. तेव्हा या निवडणुकीच्या निकालाचा अंदाज कुणालाही येऊ शकतो, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

Team Global News Marathi: