तुम्हीच असे हतबल होऊन आत्मबलिदान दिले तर मला चांगले वाटणार का?
मुंबई | खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षण रद्द केल्याने नैराश्येत मराठा तरुणांने आत्महत्येचा पर्याय न निवडण्यावरुन प्रतिक्रिया दिली आहे. युवकांनी आत्महत्या करू नयेत असे त्यांनी सांगितले असून तुम्हीच जर असे हतबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? असेही त्यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने बीडमधील तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवर शोक व्यक्त करत संभाजीराजेंनी हे आवाहन केले आहे.
“विवेक रहाडे या युवकाने समाजासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या परिवारासोबत आमच्या संवेदना आहेत. घरातील कर्तृत्वाला आलेला युवक असा अकाली जाणं, ही कधीही न भरून निघणारी हानी आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. समाजासाठी बलीदान दिलेल्या या मावळ्याला विनम्र श्रध्दांजली”.
“माझ्या निडर वाघांनो तुम्हीच जर असे हातबल होऊन आत्मबलिदान देणार असाल, तर मला चांगलं वाटणार आहे का? या लढाईतील प्रत्येक मावळा माझ्यासाठी लाखमोलाचा आहे. सर्वांना माझी नम्र विनंती आहे कोणीही असे पर्याय निवडू नयेत,” असं आवाहन यावेळी त्यांनी केले आहे.
“मराठा आरक्षणाची अटीतटीची लढाई आपण लढत आहोत. कोणत्याही परिस्थितीत हा लढा असाच चालू राहील. आणि मला विश्वास आहे की आपण नक्की जिंकू! हा लढा सुरू असताना, युवकांनी आत्महत्या करू नयेत. आत्महत्या हा पर्याय अजिबात नाही,” असंही ते म्हणाले आहेत.