टेलरिंगचे काम करत पीएचडीचा अभ्यास ; दिव्यांग प्राध्यापकाची प्रेरणादायी कहाणी : खडतर प्रवासावर केली मात

जागतिक दिव्यांग दिवस

टेलरिंगचे काम करत पीएचडीचा अभ्यास ; दिव्यांग प्राध्यापकाची प्रेरणादायी कहाणी : खडतर प्रवासावर केली मात

सोलापूर :  असे म्हणतात की, जर धैर्य खंबीर असेल तर आपण कोणत्याही ठिकाणी पोहोचू शकतो. आपल्याकडील दृढ हेतू कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचताना अडथळा बनू शकत नाहीत. आज, म्हणजेच ३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिवस साजरा होत आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रेरणादायक व्यक्तिची कथा सांगणार आहोत, ज्यांचे दिव्यंगत्व त्यांच्या स्वप्नांच्या मध्यभागी येऊ शकले नाही.

दिव्यंगत्वा सोबत जगणे आणि आयुष्यातील सर्व अडचणींना तोंड देणे प्रत्येकासाठी सोपे नाही. स्वतःचे भविष्य स्वत: घडवत एक युवा प्राध्यापक ज्ञानदानातून पुढची पिढी घडवत आहेत. प्रा. भरतकुमार जसाभाटी असं त्यांच नाव असून त्यांचा प्रवास जो की विसरणे सोपे नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी गावचे रहिवासी असलेले प्रा. भरतकुमार जसाभाटी यांना एका अपघातात दिव्यांगत्व आले. दहावीची परीक्षा झाल्यावर त्यांचा अपघात झाला. यात त्यांच्या मणक्याला आणि कंबरेला जबरदस्त मार लागला आणि कायमचे दिव्यांगत्व आले.

दिव्यांगत्त्वाला सोबत घेऊन त्यांनी बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. परिस्थिती अभावी चार वर्ष शिक्षणाला दूर केले. मिळेल तसे काम करून ते अापले पोट भरू लागले. मित्रांच्या सहकार्यातून भारत यांनी शिक्षणाची कास धरली. बार्शी येथील झाडबुके महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेत असताना रमेश नागटिळक नावाच्या मित्राने त्यांना छोटे मोठे काम मिळवून दिले. मजबुरी म्हणून त्यांनी टेलरिंगचे काम हाती घेतलं. त्यातली कौशल्य आत्मसात केली.

परिस्थिती बेताची असल्याने भरतकुमार काम आणि शिक्षण दोन्ही गोष्टी ते करू लागले. काम केल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून शिक्षणासोबत काम सुरू ठेवले. लहानपणापासून प्राध्यापक होण्याची इच्छा मनोमन बाळगल्याने त्यांनी शिवाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालयातून बी.एड.चे शिक्षण प्रथम श्रेणीतून पूर्ण केले. यावेळी श्री मनोज शिंदे यांनी शिक्षणाचा खर्च उचलला. सकाळी कॉलेज, दिवसभर टेलरिंगचे काम आणि रात्री अभ्यास असा दिनक्रम त्यांचा सुरू झाला. उदय टेलरचे मालक  मुकुंद रुद्रवार यांनी देखील वेळोवेळी सहकार्य केले.

टेलरिंगच काम करत असताना प्राध्यापक होण्यासाठी लागणाऱ्या नेट-सेट परीक्षांची तयारी सुरू केली. प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून ते एम ए मध्ये विद्यापीठातून प्रथम आले. एम.ए. च्या दुसर्‍या वर्गात असताना ते २०१३ सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी २०१५ साली नेट जेआरएफ देखील पास झाले. एम.ए. ची परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना बी.पी.सुलाखे वाणिज्य महाविद्यालयात त्यांना तास बेसिक तत्त्वावर प्राध्यापकाची नोकरी मिळाली. गेल्या नऊ वर्षांपासून ते या महाविद्यालयात ज्ञानदानाचे काम करत आहेत.

 

सकाळी ज्ञानदान, दुपारी टेलरिंग, रात्री पीएचडीचा अभ्यास 

आपल्यावर ओढवलेल्या संकटावर यशस्वीपणे मात करत परिस्थितीची कुरबुर न करता ते वाटचाल करत अाहेत. या कठिणप्रसंगी त्यांचे आई वडील आणि भाऊ हे सावलीसारखे उभे राहिले. आजही ते सकाळी महाविद्यालयात प्राध्यापक तर दिवसभर टेलरिंगचे काम करून आपली उपजीविका भागवतात.
आज ते बार्शी येथील उदय टेलर मध्ये चीफ मॅनेजर म्हणून काम करतात. यासोबत ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून ”मराठवाडी बोली चा चिकित्सक अभ्यास” या विषयावर ते पीएचडी करत आहेत. भरतकुमार यांची ज्ञानसंपदा डोळस व्यक्तीला प्रेरणादायी देणारी आहे. ‘इच्छा असेल तर मार्ग दिसतो’ ही म्हण त्यांना लागू पडते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: