महिला पोलिसांना आता १२ ऐवजी ८ तासांची ड्यूटी

महिला पोलिसांना आता १२ ऐवजी ८ तासांची ड्यूटी

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारकडून महिला पोलिसांसाठी एक महत्वपूर्ण व दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार आता महिला पोलिस कर्मचा-यांचे कामाचे तास कमी करण्यात आले असून, त्यांना आता १२ ऐवजी ८ तासांची डयुटी असणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिला पोलिस कर्मचा-यांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तास करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्याचे डीजीपी संजय पांडे यांनी दिली आहे.

पोलिस विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचा-यांकडून वारंवार ८ तासांची डयूटी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीचा विचार करत पोलिस महासंचालक यांच्या सूचनेनुसार पुणे ग्रामीणमधील महिला पोलिस कर्मचा-यांची ८ तासांच्या डयुटी या अगोदर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेली आहे. पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख यांनी याबाबत माहिती दिली होती.

खा. सुळेंनी मानले राज्य सरकारचे आभार
महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांची ड्युटी बारा तासांहून आठ तासांची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अतिशय चांगला निर्णय असून, यामुळे अनेक महिला पोलिस कर्मचा-यांना कुटुंब आणि नोकरी यामध्ये उत्तम असा ताळमेळ साधता येणे शक्य होणार आहे.

हा निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाचे मनापासून आभार, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट्द्वारे म्हटले आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: