राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार का? काय म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे!

जालना : जगातील काही देशात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत. तसंच चीनमध्ये कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलंय. अशातच देशात कोरोनाची चौथी लाट येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी चौथी लाट येणार असल्याचं मोठं विधान केलं आहे.

जालन्यामध्ये बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “युरोप, दक्षिण कोरिया आणि चीन या भागांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढतायत. त्यामुळे आपण बेजबाबदारपणे वागणं योग्य नाही, अशा आशयाचं पत्र केंद्र सरकारकडून राज्याला आलेलं आहे. हे पत्र जिल्ह्यांच्या कलेक्टरकडे पाठवण्यात आलं आहे. या पत्रानुसार जिल्ह्यांमध्ये योग्य ती कार्यवाही केली जाईल.”

“चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. याच पार्श्वभूमीवर पुढच्याला ठेच, मागचा सावध या पद्धतीने आपल्या राज्यात सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कोरोनासंदर्भातील राज्य सरकार केंद्राच्या अनुषंगाने कार्यवाही करत राहील, असंही राजेश टोपे म्हणालेत.

 

चीन आणि आग्नेय आशियासह युरोपातील काही देशांमध्ये वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता भारत सरकार सावध झालं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र लिहून सतर्क केलंआहे.

कोरोना संपला असा विचार करून कोणत्याही राज्यातील प्रशासनाने बेफिकीर राहू नये, असं भूषण यांनी पत्रात म्हटलं आहे. राजेश भूषण यांनी आपल्या पत्रात सर्व राज्यांना सावध राहण्यास आणि पंचसूत्रीचं पालन करण्यास सांगितलं आहे.  चाचणी, ट्रेसिंग, उपचार, संपूर्ण लसीकरण आणि कोविड प्रतिबंधक उपाययोजना अवलंबण्यास सांगितलं आहे.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: