“भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांची घणाघाती टीका
ग्लोबल न्यूज: पवई पोलीस स्थानकातील एका पोलीस कॉन्स्टेबलला भाजपा आमदार राम कदम यांच्या तीन कार्यकर्त्यांनी काल मारहाण केली होती. या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी भाजपा आमदार राम कदम यांनी चक्क पोलीस स्थानकात फोन करून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भातील वृत्त लोकमत वृत्तपत्र समूहाने प्रसिद्ध केले होते. या संदर्भात आता युवासेना सचिव वरून सरदेसाई यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई पोलिसांना आधी शिव्या आणि आता तर भाजपा कार्यकर्त्यांचा पोलिसांवर थेट हल्ला ? भाजपाचा आपल्या मुंबई पोलिसांवर इतका राग का? ह्या घटनेचा निषेध करावा तितका कमी. सगळ्या आरोपींना अशी कठोर शिक्षा व्हावी की पुन्हा कोणाची असली हिम्मत होता कामा नये! असे ट्विट युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केले आहे.
तसेच आज युवासेना मुंबईत आंदोलन करण्याची तयारी केली आहे. युवासेना मुंबईतील विविध ठिकाणी दुपारी अडीच वाजता आंदोलन करणार आहे अशी माहिती युवासेना कोषाध्यक्ष आणि नगरसेवक अमेय घोले यांनी दिली आहे.